आयटी इंजिनिअर असलेल्या वैष्णवी जरांडे या २३ वर्षीय विवाहितेचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याची घटना घडली. वैष्णवी पुण्यातल्या उंड्री भागातली ही घटना आहे. वैष्णवी जरांडेंने आत्महत्या केल्याचं तिच्या सासरच्या मंडळींनी म्हटलं आहे. तर तिच्या आई वडिलांनी हुंड्यासाठी वैष्णवचा छळ केला गेला. त्यामुळे ही आत्महत्या नसावी असं म्हणत संशय व्यक्त केला आहे.
९ मे २०२६ रोजी वैष्णवीचं लग्न
९ मे २०२६ ला वैष्णवी जरांडेचा विवाह ओंकार घिसरे याच्याशी झाला होता. वैष्णवी आयटी इंजिनिअर होती आणि बंगळुरू येथील आयटी कंपनीत ती नोकरी करत होती. काही काळ तिने वर्क फ्रॉम होम घेतलं होतं. याच काळात तिच्या सासरी म्हणजेच घिसरे यांच्या घरी हुंड्यासाठी छळ केला जात होता असा आरोप वैष्णवीच्या आई वडिलांनी केला आहे. वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं की आम्ही तिच्या लग्नासाठी ४५ लाख रूपये खर्च केले होते. तसंच मुलीला १० तोळे सोनंही दिलं होतं. तरीही कार खरेदी करायची आहे त्यासाठी ५ लाख रूपये घेऊन ये असं सांगत तिचा छळ करण्यात येत होता. एनडीटीव्हीने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
वैष्णवीच्या वडिलांनी नेमका काय आरोप केला आहे?
लग्नानंतर वैष्णवी आणि ओंकार हे एकत्र राहात होते. तिने तिच्या सासरी राहून काम करणं सुरू ठेवलं होतं कंपनीची संमती घेऊन तिने वर्क फ्रॉम होम घेतलं होतं. मात्र कार घ्यायची आहे तुझ्या घरून ५ लाख रूपये घेऊन ये म्हणून वैष्णवीचा तिच्या सासू-सासऱ्यांनी आणि नवऱ्याने छळ केला असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
२४ सप्टेंबरला ओंकारने फोन करून वैष्णवीच्या आई वडिलांना काय सांगितलं?
वैष्णवीच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी तिच्या पतीने म्हणजेच ओंकारने तिच्या माहेरी फोन केला होता. वैष्णवीला घेऊन जाण्यास सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास वैष्णवीने आईला फोन केला आणि सासरी आपल्याला खूप त्रास होत असल्याचे सांगितले, असा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. रात्री साडेअकराच्या सुमारास वैष्णवीच्या पतीचा तिच्या माहेरी फोन आला. “तुमच्या मुलीला घरी घेऊन जा, नाहीतर माझ्याकडून काहीतरी बरंवाईट होईल” असं तो म्हणाला होता सांगण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या फोननंतर वैष्णवीच्या आई-वडिलांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा फोन लागला नाही. मुलीच्या सुरक्षिततेची चिंता वाटल्याने ते तातडीने पुण्याच्या दिशेने रवाना झाले. मात्र तिच्या घरी गेल्यानंतर वैष्णवीचा मृत्यू झाला आहे असं तिने आत्महत्या केली असं तिच्या सासरच्या मंडळींनी तिच्या आई वडिलांना सांगितलं.
वैष्णवीच्या आई वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
वैष्णवीच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात नेमकी घटना कशी घडली? वैष्णवीने आत्महत्या केली की तिच्या मृत्यूमागे अन्य कारण आहे? याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणातील आरोप हे वैष्णवीच्या कुटुंबीयांनी केलेले आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच तिच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार आहे.
