|| हर्षद कशाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाहनचालकांची बेपर्वाई कारणीभूत

अलिबाग: रायगड जिल्ह्यात वर्षभरात झालेल्या रस्ते अपघातात २३६ जणांचा मृत्यू झाला. तर ३७९ जण गंभीर जखमी झालेत. २०२० च्या तुलनेत जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात वाढले आहे. अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या आणि जखमी होण्याऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. वाहनचालकांची बेपर्वाई आणि वाहतूक नियमांकडे केलेले दुर्लक्ष अपघातांना कारणीभूत ठरत आहे.

रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीत २०२० मध्ये ५९६ अपघातांची नोंद झाली होती. यात २०६ जणांचा मृत्यू झाला होता. तर ४०९ जण गंभीर जखमी झाले होते. या तुलनेत २०२१ मध्ये ६८८ अपघातांची नोंद झाली. या अपघातांमध्ये २३६ जणांचा बळी गेला तर ३७९ जण गंभीररीत्या जखमी झाले. २६५ किरकोळ जखमी झाले. यात मुंबई गोवा महामार्गावरील अपघातांचे प्रमाण अधिक होते.

२०२० मध्ये करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने टाळेबंदी लागू करण्यात आली होती. जवळपास पाच महिने वाहतुकीवर निर्बंध होते. त्यामुळे रस्त्यावर खाजगी वाहनांची संख्या खूपच कमी होती. त्यामुळे २०२० मध्ये अपघातांचे प्रमाण कमी झाले होते. २०२१ मध्ये वाहतुक निर्बंध शिथिल झाल्याने अपघातांचे प्रमाण पुन्हा वाढण्यास सुरू झाल्याचे दिसून आले. 

रायगड जिल्ह्यातून तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग जातात. यात मुंबई गोवा महामार्ग क्रमांक ६६, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई पुणे महामार्ग क्रमांक ४ या राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे. तीनही महामार्गांचा विचार केल्यास मुंबई गोवा महामार्गावर अपघातांचे प्रमाण उर्वरित महामार्गांपेक्षा जास्त आहे.

जिल्ह्यात वर्षभरात मुंबई गोवा महामार्गावर १५४ अपघात झाले यात ४७ जणांचा मृत्यू झाला. मुंबई पुणे दृतगती मार्गावर १३८ अपघात झाले. यात ५४ जणांचा मृत्यू झाला. या आकडेवारीचा विचार केला तर जिल्ह्यातील जवळपास ७० टक्के या तीन महामार्गावरच होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

अपघातांची कारणे…

अरुंद रस्ता, नागमोडी वळणे, तीव्र उतार, चुकीच्या आणि वाहनचालकांचा बेदरकारपणा ही अपघातांमागची प्रमुख कारणे आहेत. तर द्रूतगती मार्गावर लेनची शिस्त न पाळणे, वेग मर्यादा न पाळणे, गाड्यांचे टायर फुटणे ही अपघातांमागची प्रमुख कारणे आहेत. याशिवाय दारू पिऊन गाडी चालवणे, चुकीच्या पध्दतीने ओव्हरर्टेंकग करणे यामुळेही अपघात होत आहेत. मुंबई पुणे द्रूतगती मार्गावर ट्रकचालकांकडून घाट उतारावर वाहने न्यूट्रल गेअरवर चालवली जातात. ज्यामुळे वाहनांवरील ताबा सुटतो आणि अपघात होतात. मुंबई गोवा महामार्गावर संथगतीने सुरू असणारे रुंदीकरण काही अपघातांना कारणीभूत ठरते आहे. औद्योगिकीकरणामुळे अरुंद रस्त्यांवर वाढलेली अवजड वाहतुक हे देखील अपघांचे प्रमुख कारण आहे.

सुट्टीच्या दिवशी वाहतूक नियमनाची मागणी

वाहतूक पोलीस आणि महामार्ग पोलिसांकडून महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत. सुट्टीच्या दिवशी द्रुतगती मार्गावरील अवजड वाहतूक नियंत्रित केली जात आहे. त्याच धर्तीवर मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक सुट्टीच्या कालावधीत नियंत्रित करण्याची मागणी आता केली जात आहे.

या उपाय योजनांची गरज  

मुंबई गोवा महामार्गाचे सध्या चौपदरीकरण सुरू आहे. यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी डायव्हरर्जन्स( पर्यायी मार्ग ) टाकण्यात आले आहेत. मात्र पर्यायी मार्गाचे सूचना फलक नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांचा गोंधळ उडतो. आणि अपघात होतात. त्यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी वाहनचालकांना सूचना देणारे फलक बसवण्याची मागणी केली जात आहे. मुंबई पुणे दृतगती मार्गावर लोणावळा ते खालापूर दरम्यान तीव्र उतारावर अपघातांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या ठिकाण वाहनांचा वेग नियंत्रित करणे, वाहनचालकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.

वाहनचालकांचा बेदरकारपणा आणि वाहतूक नियमांकडे केलेले दुर्लक्ष अपघातांना कारणीभूत ठरते. देशात नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होत असतात. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करायला हवे, वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवायला हवे. चालकांचे प्रबोधन करण्याचे प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत. त्यात काही प्रमाणात यशही येत आहे. गेल्या काही वर्षात अपघातांचे प्रमाण कमी होत आहे.

– राजेंद्र पाटील, वाहतूक पोलीस निरीक्षक रायगड

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 236 killed in road accidents in raigad akp
First published on: 20-01-2022 at 00:02 IST