scorecardresearch

Premium

नांदेड शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ मृत्यू; मृतांमध्ये १२ बालकांचा समावेश, ७० रुग्णांची प्रकृती चिंताजनक

नांदेड येथील शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सोमवारी समोर आले.

nanded hospital
(शासकीय रुग्णालयात विविध संघटनांनी आंदोलन केले.)

नांदेड : येथील शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सोमवारी समोर आले. मृतांमध्ये ६ मुले व ६ मुलींचा समावेश असल्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या घटनेची नोंद घेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याचा सखोल चौकशीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे रुग्णालयात दाखल ७० रुग्णांची स्थिती चिंताजनक असल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे. गंभीर रुग्णांमध्येही अनेक बालकांचा समावेश असल्याचे समजते. 

विष्णुपुरी परिसरात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय आहे. रुग्णालयात गेल्या २४ तासांत ६ मुले व ६ मुली या १२ बालकांसह सात स्त्रिया आणि पाच पुरुष दगावल्याचे स्पष्ट झाले. मृतांमध्ये सर्पदंश, विषप्राशन तसेच अन्य आजारांचेही रुग्ण होते. यातील काही जण परराज्यातील असल्याचे सांगण्यात आले.  या घटनेची माहिती मिळताच चव्हाण यांनी सायंकाळी रुग्णालयात धाव घेतली व वस्तुस्थिती जाणून घेतली. २४ तासांत २४ रुग्ण दगावले असले तरी याला डॉक्टर किंवा इतर कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा कारणीभूत नसल्याचे सांगण्यात आले आहे. सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी सायंकाळपर्यंत रुग्णालयाकडे फिरकले नव्हते. दगावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनीही तक्रार केली नव्हती. मात्र चव्हाण यांनी या लक्ष घातल्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाला खडबडून जाग आली. मृत झालेल्या रुग्णांची नावे प्रशासनाने रात्री उशिरापर्यंत जाहीर केली नव्हती. 

patients died Medical Hospital Nagpur
धक्कादायक.. नागपुरातील मेडिकल-मेयो रुग्णालयात २४ तासांत २५ रुग्णांचा मृत्यू
Eknath SHinde
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात औषधांअभावी रुग्णांचा मृत्यू? मुख्यमंत्री शिंदे स्पष्टीकरण देत म्हणाले…
24 Deaths in Nanded Maharashtra Government Hospital
“नांदेड रुग्णालयातील मृत्यू औषधांच्या तुटवड्यामुळे नाहीत”, अधिष्ठातांनी दिली माहिती; मृत्यूमागचं सांगितलं कारण
10 kids in hospital after consuming toxic seeds
विषारी बिया खाल्याने १० बालकांची प्रकृती बिघडली; जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू

हेही वाचा>>>‘डेक्कन ओडिसी’तील बदलानंतर घट झालेल्या कार्बन उत्सर्जनाचा अभ्यास; महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचा निर्णय

सुमारे १० वर्षांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे विष्णुपुरी परिसरातील सुसज्ज परिसरात स्थलांतर करण्यात आले होते. प्रारंभीची काही वर्षे वगळता रुग्णालयाचे व्यवस्थापन ढिसाळ झाल्याचे बोलले जात आहे. वॉर्डाची दुरवस्था झाली असून स्वच्छता आणि साफसफाईच्या बाबतीत हयगय केली जात असल्याचे येथील एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. रुग्णांना वरिष्ठ डॉक्टर्स वेळच्यावेळी बघत नाहीत. रुग्णांवरील उपचाराचा भार वेगवेगळय़ा विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या तसेच कंत्राटी डॉक्टरांवर पडला असल्याची माहिती देण्यात आली. बाह्य व आंतररुग्णांची संख्या मागील काही वर्षांत झपाटय़ाने वाढली, तरी त्या तुलनेत डॉक्टर, परिचारिकांसह इतर कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याचे सांगण्यात आले.

पालकमंत्र्यांविरुद्ध घोषणाबाजी

औषध तुटवडय़ासह गलथान कारभारामुळे शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्ण दगावल्याची माहिती बाहेर आल्यानंतर विविध संघटनांचे कार्यकर्ते सायंकाळी एकत्र आले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांच्या दालनाबाहेर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

४ कोटी कुठे ‘अडकले’?

शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा नियोजन समितीतून चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातील एक कोटी रुपये औषध खरेदीसाठी, एक कोटी रुपये शस्त्रक्रियेच्या साहित्यासाठी खर्च होणार होते, परंतु वरील निधीचा प्रस्ताव तांत्रिक कचाटय़ात अडकला असल्याचे सांगण्यात आले.

जीवरक्षक औषधाचा तुटवडा

सर्पदंशावरील उपचारासाठी हाफकिन संस्थेत उत्पादित होणारे औषध वापरले जाते. मात्र मागील काही दिवसांपासून गंभीर आजारांवरील जीवरक्षक औषधांचा पुरवठा नियमितपणे होत नसल्यामुळे रुग्ण दगावत असल्याचे सांगण्यात येत आहे. याला महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनीही दुजोरा दिला. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे स्थानिक यंत्रणेवर मोठा ताण पडत असल्याचे अधिष्ठाता एस. आर. वाकुडे यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 24 deaths in 24 hours at nanded government hospital amy

First published on: 03-10-2023 at 04:22 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×