सातारा : सातारा शहर आणि वाई परिसरात सलग घरफोड्या करून पोलिसांपुढे आव्हान निर्माण करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पकडले. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली आहे. दीपक संतोष पाटणे (मूळ गाव वरवडी, ता. भोर, सध्या विंग, ता. खंडाळा) आणि आशुतोष उर्फ पप्पू प्रदीप भोसले (मूळ गाव बावधन, ता. वाई, सध्या शिरवळ, ता. खंडाळा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या टोळीचा मुख्य सूत्रधार लोकेश सुतार (रा. लिंगनूर, ता. मिरज, जि. सांगली) सध्या फरार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.

वाई आणि सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तपास करत होती.तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना या गुन्ह्यामागे दप्तरावरील गुन्हेगार लोकेश सुतार असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो पसार झाल्याचे आढळले. मात्र, अधिक तपासात सुतार याने हे गुन्हे इतर दोन साथीदार दीपक पाटणे आणि आशुतोष भोसले यांच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान, दोघांनीही गुन्ह्यांची कबुली दिली. या टोळीने वाई आणि सातारा शहरातील एकूण ४ घरफोड्या केल्याचे उघड झाले. त्यांच्याकडून चोरीला गेलेले २३ लाख ४ हजार रुपये किमतीचे २४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, फौजदार विश्वास शिंगाडे, परितोष दातीर आणि त्यांच्या पथकातील सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.