शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर नाशिक जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमधील तीन ते सहा वयोगटातील बालकांची गुरुवारी एकाच दिवशी पट-पडताळणी करण्यात आली असता मालेगाव तालुक्यात २५ टक्के बालके गैरहजर आढळून आली. गटविकास अधिकारी ए. एस. आजवेलकर यांच्या आधिपत्याखाली एकात्मिक बाल सेवा योजनेंतर्गत रावळगाव व मालेगाव या दोन प्रकल्पांमधील एकूण ५४० अंगणवाडय़ांमध्ये ही पडताळणी करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या ३१ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत अंगणवाडी केंद्रांमधील बालकांच्या उपस्थितीबद्दलच्या विषयावर वादळी चर्चा झाली होती. जिल्ह्यात सुमारे चार हजार ७५० अंगणवाडय़ा असून त्यातील काही केंद्रांमध्ये तीन ते सहा वयोगटातील बालकांची संख्या अत्यल्प असल्याची तक्रार या बैठकीत करण्यात आली होती. अकारण सुरू असणाऱ्या अशा केंद्रांमुळे बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या खर्चात वाढ होऊन शासनाचे आर्थिक नुकसान होत असल्याची शक्यताही या वेळी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या विद्यार्थ्यांची ज्या प्रमाणे मध्यंतरी पडताळणी करण्यात आली, त्याच धर्तीवर अंगणवाडी केंद्रांमधील मुलांची पट-पडताळणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला होता.
या पट-पडताळणीत मालेगाव प्रकल्पांतर्गत पटावरील एकूण १४ हजार ४२३ पैकी तीन हजार ४०२ बालक गैरहजर आढळून आले, तर रावळगाव प्रकल्पांतर्गत १२ हजार ११४ पैकी दोन हजार ४६१ बालक गैरहजर आढळून आले. तालुक्यातील ५५० प्राथमिक शिक्षक व ग्रामसेवक यांची या कामी नियुक्ती करण्यात आली होती