महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत गत पाच वर्षांत जळगाव जिल्ह्यातील एकूण २५६ गावे तंटामुक्त गाव म्हणून जाहीर झाली असून, ११ गावांची विशेष पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या जिल्ह्यातील तंटामुक्तीसाठी पात्र ठरलेल्या गावांची एकूण संख्या लक्षात घेतल्यास अद्याप ८८९ गावे तंटामुक्त होणे बाकी असल्याचे दिसून येते.
गावपातळीवरील छोटय़ा-छोटय़ा कारणांवरून निर्माण होणाऱ्या तंटय़ांचे पर्यवसान मोठय़ा तंटय़ात होऊ नये, वादामध्ये मालमत्ता अडकून आर्थिक नुकसान होऊ नये, कुटुंबाची, समाजाची व गावाची शांतता धोक्यात येऊ नये, या दृष्टीने गावात तंटे निर्माण होणार नाहीत आणि अस्तित्वात असणारे तंटे सामोपचाराने आणि आवश्यक तिथे प्रशासनाची मदत घेऊन सोडविण्याची व्यवस्था या मोहिमेद्वारे दृष्टिपथास आली आहे. तंटामुक्त गाव मोहिमेचे २०१२-१३ हे सहावे वर्ष. मागील पाच वर्षांतील जळगावच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास अजून बराच मोठा पल्ला गाठणे बाकी असल्याचे लक्षात येते. ज्या वर्षी या मोहिमेचा शुभारंभ झाला, म्हणजे २००७-०८ मध्ये या जिल्ह्यातील ६५ गावे तंटामुक्तीसाठी पात्र ठरली, तर दोन गावांनी विशेष पुरस्कार मिळविला होता. त्यानंतर २००८-०९ मध्ये जळगावची कामगिरी खाली घसरली. तेव्हा केवळ ३५ गावे तंटामुक्त गाव म्हणून जाहीर झाली तर एका गावाने विशेष पुरस्कार मिळविला. मोहिमेच्या तिसऱ्या वर्षांत म्हणजे २००९-१० मध्ये जळगावमधील ३३ गावे तंटामुक्तीसाठी पात्र ठरली. त्या वेळी एकाही गावास शांतता पुरस्कार मिळाला नाही. २०१०-११ या चौथ्या वर्षांत ५७ गावे तंटामुक्त गाव म्हणून जाहीर झाली, तेव्हा एकही गाव विशेष पुरस्कारासाठी पात्र ठरले नाही.
२०११-१२ या पाचव्या वर्षांत जळगावच्या कामगिरीत काहीशी सुधारणा झाली. ६६ गावे तंटामुक्त गाव म्हणून जाहीर झाली तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात केवळ याच जिल्ह्यातील आठ गावांनी विशेष पुरस्कार मिळविला. त्यामध्ये पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहुतेक गावांचा समावेश असल्याचे गृह विभागाच्या अहवालात म्हटले आहे. आजवरच्या कामगिरीवर नजर टाकल्यास जळगाव जिल्ह्यात मोहिमेत सहभागी होणाऱ्या १२४५ गावांपैकी २५६ गावे तंटामुक्तीसाठी पात्र ठरली आहेत. यावरून अद्याप ८८९ गावे तंटामुक्त होणे बाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.



