गडचिरोलीत धुमश्चक्री; तीन पोलीस गंभीर जखमी

गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत कोटगुल-ग्यारापत्ती जंगल परिसरात ‘सी-६०’ पोलिसांशी झालेल्या चकमकीत शनिवारी २६ नक्षलवादी ठार झाले. ही चकमक सुमारे चार तास सुरू होती. चकमकीत तीन पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांना हेलिकॉप्टरने नागपूर येथे हलवण्यात आले आहे.

‘सी-६० पोलीस दल’ नक्षलविरोधी मोहीम राबवीत असताना नक्षलवाद्यांनी पोलिसांवर बेछूट गोळीबार केला. त्याला पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. या चकमकीत एक मोठा नक्षलवादी म्होरक्या ठार झाल्याची चर्चा आहे. चकमकीत अनेक नक्षलवादी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची जंगलातील शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटगुल-ग्यारापत्ती जंगल परिसरात गुप्त माहितीच्या आधारे सी-६० नक्षलविरोधी अभियान पथकाने शनिवारी सकाळी शोधमोहीम सुरू केली. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. त्यांना पोलिसांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले. चकमक तीन ते चार तास सुरू होती. पोलिसांपुढे निभाव लागत नसल्याचे लक्षात येताच नक्षलवादी जंगलात पसार झाले. त्यांचा शोध घेण्यासाठी ही मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे.

चकमकीनंतर घटनास्थळावर अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात आली. त्यानंतर नक्षलविरोधी अभियान पथकाने घटनास्थळी शोधमोहीम राबविली. या मोहिमेत दुपारपर्यंत १० ते १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. मात्र नक्षलविरोधी अभियान पथकाने जंगलात शोध घेतला असता रक्ताचा सडा आढळला. त्यानंतर घनदाट जंगलात शोध घेण्यात आला असता नक्षलवाद्यांचे आणखी १४ मृतदेह आढळले.

पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेआठ वाजेपर्यंत २६ नक्षलवाद्यांचे मृतदेह घटनास्थळावर ताब्यात घेण्यात आले. ते रात्री उशिरा गडचिरोली येथे आणण्यात आले. मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

पोलीस अधीक्षक अंकित गोयल, धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव आणि गडचिरोली पोलीस दलातील अन्य अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या चकमकीत तीन पोलीस जवान जखमी झाले आहेत. त्यांना हेलिकॉप्टरने नागपूर येथे हलवण्यात आले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलीस अधीक्षक गोयल यांनी दिली.

मिलिंद तेलतुंबडे ठार?

या कारवाईत जहाल नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची माहिती आहे. मात्र, पोलीस त्याला दुजोरा द्यायला तयार नाहीत. तेलतुंबडे मूळचा महाराष्ट्रातील असून त्याने ३२ वर्षांपूर्वी चंद्रपूरला अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेतून कामाला सुरुवात केली होती. ‘वेकोलि’ कंपनीच्या अधिकाऱ्याच्या खुनानंतर तो बेपत्ता झाला. तो नक्षलींच्या केंद्रीय समितीचा सदस्य तसेच महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड क्षेत्रीय समितीचा प्रमुख म्हणून कार्यरत होता. नक्षलवादी चळवळ शहरी भागात रुजवण्यात त्याचा हात आहे. भिमा-कोरेगाव हिंसाचाराचा सूत्रधार अशी पोलिसांत त्याची नोंद आहे.

रात्री शोधमोहीम कठीण

रात्र झाल्याने जंगलात शोधमोहीम राबविणे कठीण झाले होते. जखमी नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी आणि ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याने पोलिसांची शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

पालकमंत्र्यांकडून  पोलिसांचे कौतुक

गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलीस दलाच्या या धाडसी कामगिरीचे कौतुक केले आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांना ठार मारण्याची ही दुसरी घटना आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवल्याद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

पोलिसांचा मला अभिमान वाटतो. ही कारवाई राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी आहे.         – दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री  

चकमकीत अनेक नक्षलवादी जखमी झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.  – अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, गडचिरोली