जालना: जालना ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर बदनापूर तालुक्यातील सेलगावजवळ धावत्या खासगी प्रवासी बसने अचानक पेट घेतल्याने गोंधळ उडून प्रवाश्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु बस चालक आणि इतरांच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व २७ प्रवासी सुखरूप बाहेर पडले. संपूर्ण बस आगीत जळून खाक झाली असली तरी कोणत्याही प्रवाश्यास इजा झाली नाही.
छत्रपती संभाजीनगर ते जालना मार्गावर मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी बहूतांश प्रवासी झोपेत होते. ही बस पुणे येथून यवतमाळकडे जात होती. अचानक आग लागल्याने प्रवाश्यांत गोंधळ उडाला. परंतु चालक आणि इतरांनी प्रसंगावधान दाखवून सर्व प्रवाश्यांना खाली उतरविले. त्यानंतर घटनास्थळापासून जवळच असलेले बदनापूर पोलिस पोहोचल्यावर जालना महानगरपालिकेच्या अग्नीशमन दलाचे वाहनही पोहोचले. सुमारे दीड तासानंतर अग्नीशमन दलाने आग विझविली. वेळीच बसमधील प्रवाश्यांना बाहेर उतरविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. टायरच्या घर्षणामुळे बसला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आग अचानकपणे कशी लागली याची माहिती घेतली जात आहे. थंडीचे दिवस असून, आग कशी लागली, याची सर्वच बाजूने माहिती घेतली जात आहे.
