दुसऱ्या औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलला उद्या (गुरुवारी) प्रारंभ होत आहे. दुपारी साडेचार वाजता ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी व अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या उपस्थितीत याचे उद्घाटन होणार आहे. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, समन्वयक उल्हास गवळी व सचिव अनिल इरावणे यांनी महोत्सव अधिक दर्जेदार करण्याचे ठरविले आहे. जगभरातील ३०हून अधिक निवडक व दर्जेदार चित्रपट, तसेच विविध जागतिक भाषांबरोबरच मल्याळम व बंगालीतील चित्रपटही दाखविण्यात येणार आहेत.

नवीन पिढी सांस्कृतिकदृष्टय़ा अभिरुचीसंपन्न व्हावी, या हेतूने नाथ ग्रुपच्या वतीने औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल सुरू करण्यात आला. गेल्या वर्षी अभिनेते नाना पाटेकर यांनी या महोत्सवास हजेरी लावली. यंदाच्या महोत्सवाची सुरुवात क्युबा देशातील ‘बीहेविअर’ चित्रपटाने होणार असून, प्रदíशत न झालेल्या चार मराठी चित्रपटांचाही आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. प्रोझोन मॉलमधील सत्यम सिनेमामध्ये हा महोत्सव होईल. या साठी अधिक स्क्रीनही वाढविण्यात आले आहेत. महोत्सवाचे समन्वयक डॉ. उल्हास गवळी, प्रोझोनचे अनिल इरावणे, नाथ बायोजिन्सचे सतीश कागलीवाल, नाथ पेपरचे आकाश कागलीवाल यांसह विविध मान्यवरांनी हा महोत्सव प्रायोजित केला आहे.