अलिबाग– मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी झालेल्या विचित्र अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. खोपोली बाह्यवळण रस्त्याजवळ गॅस टँकर पलटी झाल्याने ही दुर्घटना घडली. अपघातामुळे पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

प्रोपेन गॅस घेऊन टँकर मुंबईच्या दिशेने निघाला होता. खोपोलीजवळ असताना चालकाचा टँकरवरील ताबा सुटला. त्यामुळे तो पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर जाऊन पलटी झाला. याच वेळी पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या दोन कार टँकरवर धडकल्या. यात हुन्दाई एसेंट कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. सागर जनार्दन देशपांडे रा. निगडी पुणे, योगेश धर्मदेव सिंग रा. चिखली पुणे अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत, तर तिसऱ्या मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच, आयआरबी, महामार्ग पोलीस, अग्निशामक दल, देवदुत, अपघातग्रस्तांच्या मदतीला टीमची पथके घटनास्थळी दाखल झाली. मदत व बचावकार्य सुरू केले. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने खोपोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर टँकरमधून गॅसगळती होत नाही ना याची खात्री केली. दीड वाजता अपघातग्रस्त टँकर बाजूला करण्यात आला. त्यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत झाली.