कोयना धरणात ३ टीएमसीची वाढ; अन्य धरणांचीही टक्केवारी वाढली

कोयना धरणाच्या पाणीसाठय़ात जवळपास ३ टीएमसीची वाढ होताना, पाणीसाठा १६.५१ टीएमसी म्हणजेच १५.६९ टक्के आहे

कोयना धरण (संग्रहित छायाचित्र)

सततच्या पावसाने समाधानाचे वातावरण
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू असून, धरणात प्रतिसेकंदास २२ हजार ५४० क्सुसेक पाण्याची आवक होत आहे. पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी दमदार पाऊस कोसळत असल्याची आकडेवारी आहे. परिणामी, सर्वच जलसाठय़ांमध्ये मोठी वाढ होताना दिसून येत आहे. तर सततच्या पावसाने बळीराजा सुखावला आहे.
कोयना धरणाच्या पाणीसाठय़ात जवळपास ३ टीएमसीची वाढ होताना, पाणीसाठा १६.५१ टीएमसी म्हणजेच १५.६९ टक्के आहे. कोयनेच्या पाणलोटातील गेल्या ३६ तासांत कोयनानगरला २०६ एकूण ७५६, महाबळेश्वरला २१९ एकूण ८२८, तर नवजाला २२५ एकूण ९९० मि.मी. पाऊस कोसळला आहे. कोयनेच्या धरणक्षेत्रात येणाऱ्या पाथरपुंजला दिवसभरात ७० एकूण सर्वाधिक १४५९ मि.मी. पाऊस झाला आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाला असून, त्यात खडकवासला ६६, पानशेत ७३, वरसगाव ७४, टेमघर १०५, पवना ५६, वीर २५, नीरा देवघर १०७ तर भाटघर धरणक्षेत्रात ४३ मि.मी. पावसाची नोंद आहे. दिवसभरात वारणा २७, दूधगंगा ३२, धोम ५, कण्हेर १५, बलकवडी ३१, उरमोडी २४ तसेच तारळी धरण येथे १५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील धरणांचा पाणीसाठा टीएमसीमध्ये व त्याची कंसात टक्केवारी- कोयना १६.५१ (१५.६९), वारणा ९.५० (२७.६२), धोम २.८० (२०.७६), कण्हेर २.०४ (२०.१८), राधानगरी २.४५ (२९.२५), दूधगंगा २.८२ (५.८७), तारळी १.१० (१८.७९), धोम-बलकवडी ०.८७ (१८.९३), उरमोडी ३.७१ (३७.२८), वीर ०.७६ (८.१२), नीरा देवघर ०.७५ (६.४०), भाटघर २.३५ (१०.०२), पवना १.५१ (१७.७८), पानशेत १.५१(१७.७८), उजनी उणे २८.६० (उणे ५३.३९).

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 3 tmc water increase in koyna dam