मुंबई : राज्यात मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आतापर्यंत ३०० हेक्टर भूसंपादन झाले असून यासाठी प्रकल्पग्रस्तांना एकूण २ हजार २४८ कोटी रुपये मोबदला दिल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनकडून देण्यात आली. पालघर आणि ठाणे जिल्ह्यात भूसंपादनाला काहीशी गती मिळाली असतानाच मुंबईत मात्र बुलेट ट्रेन स्थानकासाठी झगडावे लागत आहे.
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ठाणे, पालघर जिल्ह्याबरोबरच मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील एकूण सरकारी व खासगी ४३३.८२ हेक्टर जमिन लागणार आहे. ठाणे जिल्ह्यातील २२ गावे, पालघर जिल्ह्यातील ७३ गावे आणि मुंबईतील दोन ठिकाणांमधील खासगी भूसंपादन नॅशनल हायस्पीड रेल्वेला करावे लागत आहे. सुरुवातीला ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील भूसंपादनाला स्थानिक व लोकप्रतिनिधींकडून विरोध होत असतानाच आता याच भागातून भूसंपादनाला काहीशी गती मिळू लागली आहे. यामध्ये ज्या प्रकल्पग्रस्तांची जमीन संपादित केली जात आहे, त्यांना चांगला मोबदला दिला जात आहे.
नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत ४३३.८२ हेक्टर पैकी राज्यात ३००.४८ हेक्टर भूसंपादन झाले असून त्याचे प्रमाण ७० टक्के आहे. ठाणे जिल्ह्यात १९०.०७ हेक्टर आणि पालघर जिल्ह्यात ११०.४१ हेक्टर भूसंपादन झाले असून मुंबई उपनगरीय मार्गावरील लागणारी जागा अद्यापही संपादित झाली नसल्याचे सांगण्यात आले. राज्यात २००१ खासगी भूखंडासाठी २ हजार २४८ कोटी ७८ लाख रुपये मोबदला प्रकल्पग्रस्तांना देण्यात आला आहे.
बीकेसी स्थानक, बोगद्यासाठी निविदा नाहीच
वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी)येथील भुयारी स्थानक आणि या स्थानकापासून ते कल्याण शिळफाटा असा २१ किलोमीटरचा बोगदाच्या कामासाठी निविदा काढली जाणार होती. यात स्थानकासाठी ७ एप्रिला, तर २ मार्चला बोगद्याच्या कामासाठी निविदा काढण्यात येणार होती. परंतु नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनकडून त्या रद्द करण्यात आल्या होत्या. अद्यापही निविदा काढण्यात आल्या नसल्याची माहीती कॉर्पोरेशनकडून देण्यात आली. वांद्रे कुर्ला संकुल येथील जमिन एमएमआरडीएद्वारा हस्तांतरीत करतानाच वन खात्याकडून मंजुरी मिळाल्यानंतरच निविदा काढली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
’ गुजरातमध्ये १९८ गावांतील जमीन संपादित करावी लागली असून ९५४.२८ हेक्टरपैकी ९४२.५२ हेक्टर भूसंपादन झाले आहे.
’ ९८.७७ टक्के जागा हायस्पीड कॉर्पोरेशनला मिळाली आहे.
’ आतापर्यंत गुजरातमधील ६ हजार २१६ भूखंडासाठी प्रकल्पग्रस्तांना ५८६० कोटी ९९ लाख रुपये मोबदला, तसेच दादरा नगर हवेलीतील ७.९० हेक्टर जमीन संपादित झाली असून १३४ भूखंडासाठी ६९ कोटी ८७ लाख रुपये मोबदला अदा केला आहे.