सोलापुरात बुधवारी एकाच दिवशी ३१ नवे करोनाबाधित रूग्ण आढळून आले असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांची एकूण रूग्णसंख्या ३०८ वर पोहोचली असून मृतांचा आकडाही २१ पर्यंत वाढला आहे. दरम्यान, एकीकडे करोनाबाधित रूग्ण वाढत असले तरी दुसरीकडे रूग्णालयात यशस्वी उपचार करून घरी परतणा-या रूग्णांची संख्याही ८४ झाल्याचे पाहावयास मिळाले आहे.

बुधवारी आढळून आलेल्या करोनाबाधित ३१ रूग्णांमध्ये १५ पुरूष व १६ महिला आहेत. तर बळी गेलेले दोन्हीही पुरूष आहेत. आतापर्यंत सापडलेल्या रूग्णांची संख्या ३०८ झाली असून त्यात १७३ पुरूष व १३५ महिलांचा समावेश आहे. तर एकूण मृतांमध्ये ११ पुरूष व १० महिला आहेत. तर दुसरीकडे रूग्णालयात करोनावर मात करून घरी पाठविण्यात आलेल्या एकूण ८४ रूग्णांमध्ये ५५ पुरूषांचा समावेश आहे. आज एकूण १२९ करोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. अद्यापि १४२ अहवाल प्राप्त व्हायचे आहेत. गुरूनानकनगरातील ६० वर्षाच्या एका वृध्द पुरूषाला दोन दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच भवानी पेठेतील इंदिरा वसाहतीत राहणाऱ्या एका ७२ वर्षाच्या वृध्दालाही रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु या दोन्ही वृध्दांचा काल मंगळवारी मृत्यू झाला. त्यांच्या करोना चाचणीचा अहवाल बुधवारी प्राप्त होऊन त्यात दोघांनाही करोनाबाधा झाली होती, असे आढळतात आले. आज आढळून आलेल्या रूग्णांमध्ये सात रूग्ण भारतरत्न इंदिरा गांधी झोपडपट्टीतील असून सहा रूग्ण साईबाबा चौकातील आहेत तर चार रूग्ण शास्त्रीनगरातील आहेत. विजापूर रस्त्यावर कुमारस्वामीनगर, रामलिंगनगर आदी भागातही करोना विषाणूने शिरकाव केला आहे.