जिल्ह्य़ातील बहुतांश पर्यटन केंद्रांवर गर्दी

सरत्या वर्षांला निरोप देण्यासाठी तसेच नववर्षांच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्य़ातील समुद्र किनारे सज्ज झाले आहेत. या निमित्ताने जिल्ह्य़ात २५ ते ३० हजार पर्यटक दाखल होण्याचा अंदाज आहे. या पाश्र्वभुमीवर रायगड पोलीस दलाने विशेष खबरदारी घेतली आहे. पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.  तळीराम वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत. सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांच्या तीन स्पीड बोटी रात्र-दिवस गस्ती ठेवण्यात येणार आहेत.

नववर्षांच्या स्वागतासाठी कोकणात मोठय़ा संख्येने पर्यटक दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. अलिबाग, मुरुड, दिवेआगर, किहीम, मांडवा, नागाव, आक्षी, रेवदंडा हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले माथेरानही पर्यटकांनी बहरून गेले आहे. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनापासून दूर कुठेतरी शांत ठिकाणी नवीन वर्षांचे सेलिब्रेशन करावे असा कल गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळतो आहे. त्यामुळे अलिबाग आणि मुरुड परिसर हा मुंबईकरांची मोठी गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. ३० आणि ३१ डिसेंबर या दोन तारखांसाठी जिल्ह्य़ातील बहुतांश हॉटेल्स, लॉजेस आणि रिसॉर्ट्सवर शंभर टक्के बुकिंग झाले आहे.

पर्यटकांना आकर्षति करण्यासाठी ठिकठिकाणी न्यू ईअर सेलिब्रेशन पार्टीजचे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल व्यावसायिकांनी ऑर्केस्ट्रा, डीजे नाइट्स, गाला डान्स, सेलिब्रिटी नाइट्सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कपल एन्ट्रीसाठी निरनिराळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. अनलिमिटेड फूड आणि ड्रिंक्सची प्रलोभने दिली जात आहेत. यासाठी दोन हजार रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत प्रवेशिका ठेवण्यात आल्या आहेत.

नाताळचा सण आणि लागोपाठ आलेल्या सुट्टय़ांच्या पाश्र्वभूमीवर २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्य़ात जवळपास ३० ते ३५ हजार पर्यटक दाखल झाले होते. त्यामुळे वाहनांची संख्या प्रचंड वाढली होती. मुंबई-गोवा महामार्गासह, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, अलिबाग मुरुड मार्ग, अलिबाग पेण महामार्गावर वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती. आठ ते दहा किलोमीटरचे अंतर पार पाडण्यासाठी दोन ते अडीच तास लागत होते. त्यामुळे वाहनचालक आणि प्रावाशांचे हाल झाले होते. त्यामुळे वाहतूक नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

सावर्जनिक ठिकाणी मद्यपानास बंदी

राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३१ डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत मद्य विक्रीला परवानगी दिली असली तरी, पर्यटकांना सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास पोलिसांनी र्निबध घातले आहेत. समुद्र किनारे, मोकळी मदाने येथे पर्यटकांना मद्यप्राशन करता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन िधगाणा घालणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. तळीराम वाहनचालकांवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी ब्रेथ अ‍ॅनलायझर बसविण्यात येणार आहेत.

महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी

नववर्षांच्या पाश्र्वभूमीवर रायगड जिल्ह्य़ात मोठय़ा संख्येने पर्यटक येण्याची शक्यता आहे. नाताळातील तीन दिवस झालेली वाहतूक कोंडी लक्षात घेऊन मुंबई-गोवा महामार्गावर २९ ते ३१ डिसेंबर  या कालावधीत अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. गरज भासल्यास १ जानेवारीला दिवसभर अवजड वाहतूक नियंत्रित केली जाणार आहे.

समुद्र किनाऱ्यांवर तात्पुरत्या पोलीस चौक्या

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्य़ातील प्रमुख समुद्र किनाऱ्यांवर तात्पुरत्या पोलीस चौक्या उभारण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी २४ तास पोलीस बंदोबस्त तनात राहणार आहे. बीट मार्शल्स, दामिनी पथक, साध्या गणवेषातील कर्मचाऱ्यांसह, सशस्त्र पोलीस बंदोबस्त किनाऱ्यांवर ठेवला जाणार आहे.

पर्यटकांनी थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन जरूर करावे, मात्र आपल्या उत्साहामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी, सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून धिंगाणा घातला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.    – संजयकुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक रायगड

२९ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत तालुक्यातील बहुतांश हॉटेल्सचे बुकिंग पूर्ण झाले आहेत. नवीन वर्षांचे जल्लोषात स्वागत करता यावे यासाठी पर्यटकांच्या आग्रहानुसार न्यू ईअर पार्टीजचेही आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्य़ात ३० हजारांहून अधिक पर्यटक दाखल होतील अशी अपेक्षा आहे.    – मानसी चेऊलकर, संचालिका माय फार्म ग्रूप