सोलापुरात आज(शनिवार) सकाळी आठ वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार सोलापुरात ३२ नवे करोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण रूग्णसंख्या ५४८ वर पोहोचली आहे. यात आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या ४० जणांचा समावेश आहे. दुसरीकडे करोनावर यशस्वीपणे मात करून घरी परतलेल्या रूग्णांचीही २२४  झाली आहे.

शुक्रवार सायंकाळपर्यंत २८ नवे रूग्ण सापडले होते. त्यानंतर रात्रीत आणखी ३२ रूग्णांची भर पडली. यात २१ पुरूष व ११ महिलांचा समावेश आहे. आज सकाळी १३५ चाचणी अहवाल प्राप्त झाले असता त्यात हे नवे रूग्ण आढळून आले. आतापर्यंत एकूण ५ हजार ३२९ संशयित रूग्णांची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी ४ हजार ७८१ रूग्णांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आणखी वाचा- औरंगाबाद जिल्ह्यात 23 नवे करोनाबाधित, एकूण रुग्ण संख्या 1 हजार 241 वर

जगभरात थैमान घालत असलेल्या जीवघेण्या करोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात ६ हजार ६५४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून, १३७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख २५ हजार १०१ वर पोहचली आहे. मात्र, असे जरी असले तरी करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे करोनाच्या महासाथीचा प्रादुर्भावाचा वेग कमी करण्यात मोठे यश आल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे.