करोनाकाळातही ३४ पाटबंधारे प्रकल्प पूर्ण ; दोन लाख हेक्टर्स सिंचनक्षमता निर्मिती

राज्यातील अनेक पाटबंधारे प्रकल्प निधीअभावी व इतर अनेक कारणांमुळे रखडलेले आहेत

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या करोना संकटातही ३४ पाटबंधारे प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यात आली. त्यातून २ लाख १५ हजार हेक्टर सिंचनक्षमता निर्माण झाली आहे. आगामी दोन वर्षांत बांधकामाधीन १०४ प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

राज्यातील अनेक पाटबंधारे प्रकल्प निधीअभावी व इतर अनेक कारणांमुळे रखडलेले आहेत. काही प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने कृषी व सिंचनाच्या प्रश्नावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रखडलेले व अर्धवट अवस्थेतील प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याचा परिणाम म्हणजे, करोना साथीचे संकट असतानाही गेल्या केवळ दोन वर्षांत, बांधकामाधीन ३४ प्रकल्प पूर्ण करण्यात यश मिळाले. त्यातून सिंचनक्षमता तर वाढलीच, त्याचबरोबर ३०६.८६ दश लक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून पुढील दहा वर्षांत राज्यातील निवडक धरणांच्या सुरक्षेसाठी बळकटीकरण, देखभाल व इतर उपांगांची पुनस्र्थापना व सुधारणा करण्यात येणार आहे. त्याचा खर्च ९६५ कोटी ६५ लाख रुपये आहे. त्यातून १२ धरणांच्या ६२४ कोटी रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आगामी दोन वर्षांत बांधकामाधीन २७० पैकी १०४ पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातून देण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 34 irrigation projects completed in corona period zws

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या