वैरागजवळ बारा इमाम देवस्थानातून ३५ किलो चांदी व १४ तोळे सोने लंपास

बार्शी तालुक्यातील पिंपरी आर येथील ग्रामदैवत बारा इमाम देवस्थानातून अज्ञात चोरटय़ांनी १४ तोळे सोने व ३५ किलो चांदीचे साहित्य लांबविल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

बार्शी तालुक्यातील पिंपरी आर येथील ग्रामदैवत बारा इमाम देवस्थानातून अज्ञात चोरटय़ांनी १४ तोळे सोने व ३५ किलो चांदीचे साहित्य लांबविल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. वैराग पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद झाली असून या घटनेमुळे पिंपरी व आसपासच्या गावातील भाविकांना धक्का बसला आहे.
पिंपरी आर येथे ग्रामदैवत बारा इमाम देवाचे स्थान आहे. प्राचीन परंपरा लाभलेल्या या देवाचा उत्सव मोहरम महिन्यात साजरा होतो. या देवस्थानाचे वंश परंपरागत मुजावर (पुजारी) असलेले लियाकत सुबहान सय्यद हे नित्य नियमाप्रमाणे काल शुक्रवारी रात्री नऊ वाजता देवस्थानातील पूजा अर्चा पूर्ण झाल्यानंतर देवस्थानाला कुलूप घालून घराकडे गेले. परंतु शनिवारी सकाळी सातच्या सुमारास देवस्थानाकडे परतले तेव्हा अज्ञात चोरटय़ांनी देवस्थानात चोरी केल्याचे दिसून आले. चोरटय़ाने देवस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे व आतील दरवाजाचे कुलूप व कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. देवस्थानातील कपाटात शेकडो वर्षांपासून जपून ठेवलेले १४ तोळे सोने व ३५ किलो चांदीचे साहित्य लंपास केले. चोरीला गेलेल्या साहित्याची किंमत १२ लाख २५ हजार इतकी दर्शविण्यात आली आहे. हा धाडसी चोरीचा प्रकार घडल्याचे दिसून येताच गावात खळबळ माजली. समस्त गावकऱ्यांना धक्का बसला. आता देवसुध्दा सुरक्षित नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, या घटनेप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनी बारा इमाम देवस्थानास भेट देऊन चोरीच्या गुन्ह्य़ाचे निरीक्षण नोंदविले व तपास अधिकारी असलेले वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांना सूचना दिल्या. या गुन्ह्य़ाच्या तपासासाठी गुन्हे शाखेसह पोलिसांची चार पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 35 kg silver and 14 tola gold theft in bara emam temple

ताज्या बातम्या