औरंगाबादेत ३५ तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी

दोन चोरीच्या घटनांमध्ये तब्बल ३६ तोळे सोन्याचे दागिने व दोन लाखांची रोकड पळवण्यात आली.

पोलिसांनी पंचनामा करून तक्रार दाखल करून घेतली.

सलग दोन घटनांनी पोलिसांपुढे आव्हान

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील पदमपुरा भागात शनिवारी भरदिवसा तर सातारा परिसरात रविवारी दुपारी मिळून घडलेल्या दोन चोरीच्या घटनांमध्ये तब्बल ३६ तोळे सोन्याचे दागिने व दोन लाखांची रोकड पळवण्यात आली. वेदांतनगर व सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटना आहेत.

वेदांतनगर पोलीस ठाण्यात रमण रामानुज रांदड (वय ३९) यांनी तक्रार दिली आहे. पदमपुरा भागातील नवयुग कॉलनीतील वेणुगोपाल हाईट्स या इमारतीत रांदड हे राहतात. रांदड हे एका मोठय़ा कपडय़ाच्या दुकानात व्यवस्थापक म्हणून काम करतात. तर त्यांची पत्नी एका बँकेत नोकरीला आहे. शनिवारी सकाळी १० वाजता रांदड दुकानात गेले तर त्यांची पत्नी बँकेत गेली. लहान मुलगा शाळेत गेला होता. दुपारी १.४५ वाजता रांदड हे घरी आल्यानंतर त्यांना घराचे कुलूप कडीकोंडा तोडलेल्या अवस्थेत दिसून आला. आत जाऊन पाहिले असता कपाटातील साडे चौदा तोळ्याचे दागिने, दुकानाच्या व्यवहारातील ९२ हजार रुपये रोख, असा ३ लाख ३४ हजारांचा ऐवज चोरटय़ांनी चोरून नेल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती वेदांतनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून तक्रार दाखल करून घेतली. पदमपुरा भागात दिवसा धाडसी चोरी करण्याची अलीकडच्या काळातील ही तिसरी घटना आहे.

सातारा परिसरातील साई प्लाझा इमारतीत राहणारे प्रशांत बाबासाहेब कोळसे हे सरकारी कंत्राटदार आहेत. ते शुक्रवारी सकाळी अहमदनगर जिल्ह्य़ात येत असलेल्या नेवाशाजवळील भेंडा फॅक्ट्री येथे कुटुंबीयांसह आई-वडिलांकडे गेले होते. रविवारी सकाळी ते परत आले तेव्हा त्यांना घराचा दरवाजा खुला आढळून आला. आत जाऊन पाहिले असता कपाट उघडे होते. आतील सामान घरभर अस्ताव्यस्त विखुरलेले होते. सामानाची पाहणी केली असता कपाटातील २२ तोळे सोन्याचे दागिने, म्हाडाचे कंत्राट घ्यायचे म्हणून ठेवलेली सव्वा लाख रोख रक्कमही चोरटय़ांनी पळवली. घटनेची माहिती सातारा पोलिसांना देण्यात आली. सातारा पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्रीपर्यंत सुरू होती.

पदमपुऱ्यातील चोरीचा तपास थंड

सव्वा वर्षांपूर्वी पदमपुऱ्यात दिवसात दोन चोरीच्या घटना घडल्या. एका प्राध्यापकासह जितेंद्र जैन यांचेही घर चोरटय़ांनी तीन महिन्यांच्या फरकात सारख्याच पद्धतीने फोडले होते. दोन्ही चोऱ्या सकाळी दहा ते दुपारी १ च्या आसपासच झालेली होती. या दोन्ही चोरीतून मिळून चार ते पाच लाखांचा ऐवज पळवला होता. या घटनेचा अजूनही तपास लागलेला नाही. शनिवारी पुन्हा एक चोरीची घटना घडली. या तिन्ही घटनांचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 35 tola gold jewelry stolen in aurangabad

ताज्या बातम्या