Premium

रायगड : ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी स्वराज्याची राजधानी सज्ज; प्रशासकीय तयारी पूर्ण

किल्ले रायगडावर १ जून ते ७ जून दरम्यान ३५० वा शिवाराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

coronation ceremony Shivaji maharaj
रायगड : ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी स्वराज्याची राजधानी सज्ज; सोहळ्यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

अलिबाग- किल्ले रायगडावर १ जून ते ७ जून दरम्यान ३५० वा शिवाराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. शिवभक्तांनी प्रशासनाकडून दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी केले. ते अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे उपस्थित होते. शिवाराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रशासकीय तयारीची माहिती यावेळी पत्रकारांना दिली. राज्यसरकारच्या वतीने किल्ले रायगडावर यंदा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने गडावर सहा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत मोठ्या संख्येने शिवभक्त आणि पर्यटक मोठ्या संख्येने गडावर दाखल होणार आहेत. हीबाब लक्षात घेऊन प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली असल्याचे म्हसे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा – Petrol-Diesel Price on 31 May: आज अनेक शहरांत कमी झाले पेट्रोल-डिझेलचे दर, जाणून घ्या नवीन दर

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासनाने ३६ समित्यांचे गठन केले आहे. या समित्यांच्या माध्यमातून गेली दोन महिने सोहळ्याचे नियोजन सुरू आहे. गडाच्या पायथ्याशी राज्यभरातून येणाऱ्या पर्यटक आणि शिवभक्तांसाठी कोंझर, वालुसरे, कवळीचा माळ आणि पाचाड येथे वाहनतळांची उभारणी करण्यात आली आहे. एकाच वेळी साडेतीन हजार वाहने या ठिकाणी पार्कींग करून ठेवता येणार आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने गडावर १० हजार लीटर आणि गडाच्या पायथ्याशी चाळीस हजार लीटर पाणीसाठा करण्यात आला आहे. शिवभक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी २४ वैद्यकीय सेंटर्स तैनात केली जाणार आहेत. यात गडावर सहा, पायऱ्यांवर सहा तर पायथ्याशी सात आणि वाहनतळांवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणार आहेत. गडावर अतिमहत्त्वाच्या वक्तींच्या सोयीसाठी पाचाड शिवसृष्टी परीसरात ३ हेलिपॅड तयार करण्यात आली आहेत. गडावर आणि पायथ्याशी अग्निशमन यंत्रणा तयार करण्यात आली आहे.

गडावर येण्यासाठी चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा असे दोन मार्ग उपलब्ध असणार आहेत. रज्जू मार्ग हा निमंत्रितांसाठी मर्यादित राहणार आहे. त्यामुळे शिवभक्तांनी चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा मार्गेच गडावर यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. हृदयविकार, मधुमेह आणि श्वसन विकार असलेल्या व्यक्तींनी गडावर येणे टाळावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तैनात असणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांनी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सुचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन केले. तर गडावर १०९ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून दोन हजार पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. येणाऱ्या शिवभक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी १ हजार दिशा दर्शक फलक लावण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – “मार खाऊ शकता” म्हणणाऱ्या घनश्याम दरोडेला गौतमी पाटीलचं सडेतोड उत्तर; म्हणाली, “मी इतकंच म्हणेन…”

गडावर आकर्षक रोषणाई

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून गडावर फसाड पद्धतीची रोषणाई करण्यात येणार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी स्वराज्याची राजधानी उजळून निघणार आहे. याशिवाय गडाच्या पायरी मार्गावरही रात्री येणाऱ्या शिवभक्तांसाठी पथदिवे लावण्यात आले आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

१ ते ७ जून दरम्यान गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. गडावर शिवकल्याण राजा, शिववंदना, नंदेश उमप रजनी यासारख्या शिवमहिमा सांगणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या शिवाय नामवंत शाहीर शिवमहिमा सांगणारे पोवाडे सादर करणार आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 350 th coronation ceremony of shivaji maharaj in raigad administrative preparations for the ceremony are complete ssb

First published on: 31-05-2023 at 09:34 IST
Next Story
“मार खाऊ शकता” म्हणणाऱ्या घनश्याम दरोडेला गौतमी पाटीलचं सडेतोड उत्तर; म्हणाली, “मी इतकंच म्हणेन…”