अकोट येथे बियाणे गुणवत्ता नियंत्रण पथकाने व्यापाऱ्याच्या गोदामावर टाक लेल्या छाप्यात ३७ लाख रुपये किमतीचे सोयाबीनचे ४१४ क्विंटल बनावट बियाणे जप्त करण्यात आले. कोणतीही प्रक्रिया न करताच सोयाबीनचे हे बनावट बियाणे बाजारात विक्रीला नेण्याच्या तयारीत असतांनाच हा छापा टाकण्यात आला व ते सर्व बियाणे जप्त करण्यात आले. या हंगामातील ही पहिली सर्वात मोठी कारवाई आहे. सोयाबीन जेएस ३३५ या नावाने असलेल्या बारदाण्यात हे बनावट सोयाबीन भरण्यात येत होते.
अकोट-हिवरखेड मार्गावरील दुर्गा इंडस्ट्रीजमध्ये सोयाबीनचे बनावट बियाणे पॅकिंग होत असल्याची माहिती अकोल्याच्या कृषी विभागाला मिळाली. त्यांनी तेथे छापा घातला असता सोयाबीनचा मोठा साठा आठळून आला. स्थानिक बाजारातून सोयाबीन विकत घेऊन त्यावर कोणतीही प्रक्रिया न करता हे सोयाबीन इंडो अ‍ॅग्रो जेनेटिक्स सीडस्, देवास या कंपनीच्या पिशवीत भरण्यात येत होते.
ही पिशवी प्रत्येकी ३० किलो गॅ्रमची आहे. या प्रत्येक पिशवीची किंमत जवळपास २७०० रुपये आहे. खुल्या बाजारातून विकत घेतलेल्या सोयाबीनवर कोणतीही प्रक्रिया न करता ते सोयाबीन उत्तम प्रतीचे बियाणे म्हणून कर्नाटकात विकण्यात येत होते, अशी माहिती आहे.
या प्रकरणी जिल्हा गुणनियंत्रक गिरीश नानोटी यांनी १९ जूनच्या रात्री पोलिसात फिर्याद दिल्ल्यावरून आरोपी बजरंग मंगलचंद अग्रवाल (रा.तालीकोट, कर्नाटक), कैलास सिंग, भोपाळच्या बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे संचालक एम.एन. गोगुलवार, देवासच्या इंडो अ‍ॅग्रो जेनेटिक्स सीडचे संचालक, तसेच अकोटच्या दुर्गा अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजचे संचालक या सर्वाविरोधात अकोट पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
या प्रकरणी बजरंग मंगलचंद अग्रवाल याला अटक करण्यात आली आहे. खुल्या बाजारातून कमी किमतीत सोयाबीनचे बियाणे विकत घ्यायचे व त्यावर कोणतीच प्रक्रिया न करता नामांकित कंपन्यांचे लेबल लावून ते चढय़ा भावाने बाजारात विकायचे, असा हा गोरखधंदा सुरू होता. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. चार ट्रक बियाणे बाजारात गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी नाव जरी कर्नाटकच्या व्यापाऱ्याचे समोर आले असले तरी अकोटमधील काही व्यापारी व अडते यात सामील असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस त्यांची माहिती घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी उदय काथोडे व पंचायत समितीचे कृषी अधिकारी अनिल राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली.