scorecardresearch

सोलापूर सेतू कार्यालयात ३८०० दाखले प्रलंबितच

सोलापूरच्या सेतू कार्यालयातच विविध हरकती व त्रुटींची पूर्तता न झाल्यामुळे सद्य:स्थितीत सुमारे ३८०० दाखले निर्गत न होता प्रलंबित आहेत. यात अनुसूचित जाती- जमातींचे ६००, तर इतर मागास प्रवर्गाचे सुमारे ८०० दाखले समाविष्ट आहेत.

सोलापूरच्या सेतू कार्यालयातच विविध हरकती व त्रुटींची पूर्तता न झाल्यामुळे सद्य:स्थितीत सुमारे ३८०० दाखले निर्गत न होता प्रलंबित आहेत. यात अनुसूचित जाती- जमातींचे ६००, तर इतर मागास प्रवर्गाचे सुमारे ८०० दाखले समाविष्ट आहेत.
उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तहसील क्षेत्राशी निगडीत असलेल्या सेतू कार्यालयात चालू २०१४-१५ शैक्षणिक वर्षांस प्रारंभ होण्याअगोदरपासून विविध आवश्यक दाखले घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची झुंबड पडत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला खेटून कार्यरत असलेल्या सेतू कार्यालयात वाढत्या गर्दीमुळे दलालांचेही चांगलेच फावत असल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांना त्याची दखल कारवाई करावी लागली. यात सेतू चालकासह दलालांविरुद्ध फौजदारी कारवाई झाल्यामुळे सेतू कार्यालयातील कारभार पारदर्शक व सुलभ होईल आणि नागरिकांना वेळेवर दाखले उपलब्ध होतील, अशी अपेक्षा होती. परंतु महसूल यंत्रणाही सामान्य नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
दलालांचा सुळसुळाट कमी झाल्यामुळे एकीकडे महसूल यंत्रणेचा दबदबा वाढल्याचे मानले जात असताना दुसरीकडे विविध दाखले तयार करताना त्यात जाणीवपूर्वक हरकती, पुनरहरकती घेऊन त्रुटी दाखविणे आणि त्यांची पूर्तता करायला नागरिकांना भाग पाडले जात आहे. एखाद्या शालेय अल्पवयीन मुलीच्या जातीचा दाखला अडवून ठेवताना घेतलेल्या हरकतीमध्ये ‘सदर मुलीच्या माहेरचा पुरावा’ मागण्यात आल्याचा अफलातून प्रकारही उघड झाला आहे. जातीच्या दाखल्यासाठी ५० वर्षांपूर्वीचा पुरावा देऊनसुद्धा या ना त्या कारणाने संबंधितांना पिटाळले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या अगोदर सेतू कार्यालयाला दलालांचा विळखा पडला होता. त्या वेळी नागरिकांनी पुरेसा दर दिल्यामुळे त्यांना वेळेवर दाखले मिळत असत. त्यात हरकतींचे प्रमाणही तुलनेने कमी होते, असे सांगण्यात येते.
सद्य:स्थितीत सेतू कार्यालयात हरकती, पुनर्हरकतींची पूर्तता न झाल्यामुळे सुमारे ३८०० दाखले प्रलंबित आहेत. यात अनुसूचित जाती- जमातींचे ६००, इतर मागासप्रवर्ग ८००, भटक्या जाती १५०, भटक्या जमाती ३००, विशेष मागास प्रवर्ग २०० यांचा समावेश आहे. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळाल्यानंतर या समाजातील नागरिकांनी ओबीसी जातीचे दाखले मिळण्यासाठी ४०० अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी ८७ दाखल्यांची पूर्तता करताना २९ प्रकरणे हरकतींमुळे प्रलंबित ठेवण्यात आल्याची माहिती सेतू कार्यालयातील सूत्रांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-07-2014 at 03:52 IST

संबंधित बातम्या