“प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं” असं आपण बऱ्याचदा ऐकतो, मात्र बुलढाणा जिल्ह्यातील तरुणाने प्रेयसीच्या प्रेमासाठी आणि तिचे लाड पुरवण्यासाठी चक्क चोऱ्या करण्याचा मार्ग अवलंबला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. प्रेमासाठी चोर झालेल्या या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर या तरुणाच्या सहकाऱ्यांनी देखील मौज मजा करण्यासाठी अनेक चोऱ्या केल्याचही समोर आलंय.
१२ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरणाऱ्या चार युवकांना शेगाव शहरातून अटक केली होती. त्यांच्याकडून १६ दुचाकींसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या आरोपींच्या चौकशीदरम्यान शेख शाहरुख शेख फिरोजने अत्यंत धक्कादायक माहिती पोलिसांना दिली. आपल्या प्रेयसीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी चोरी करु लागलो, असं त्याने पोलिसांना सांगितलं.
प्रेयसीला महागड्या आणि आकर्षक वस्तू भेट देण्यासाठी शेख चोऱ्या करायचा. हा तरुण एवढ्यावरच न थांबता काही दिवसानंतर प्रेमाचा भंग झाल्याने तो चोरीसह, दारू, गांजा, जुगार याच्या आहारीही गेला होता, अशी कबुली त्याने स्वतः दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेले शेख शाहरुख शेख फिरोज, शेख मोबीन शेख हरून, अमान खान असलम खान, मुंसिफ खान अल्ताफ खान हे चारही आरोपी प्रतिष्ठित कुटुंबातील असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. यातील शेख शाहरुख हा प्रेमात पुरता बुडाल्याने प्रेयसीला आकर्षित करण्यासाठी महागडी दुचाकी, तेवढाच महागडा मोबाईल, आणि उच्च प्रतीचे कपडे परिधान करण्याची हौस जडली होती. आपली ही महागडी जीवनशैली जपण्यासाठी त्याने चोरी करण्याचा मार्ग निवडल्याचे निष्पन्न झाले आहे.
हे चारही तरुण शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावरून दुचाकी लंपास करत होते. या दुचाकी विकत घेणाऱ्या व्यक्तींच्या कुंडल्या देखील स्थानिक गुन्हे शाखेने काढल्या असून त्यांना लवकरच अटक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आतापर्यंत पोलिसांनी यातील सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत, त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांसोबत सुसंवाद ठेवून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे झाले आहे, असं बुलढाण्याचे स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख बळीराम गीते यांनी म्हटलंय.