बार्शी येथील अलीपूर रस्त्यावर पुलाजवळील ओढय़ात पोहण्यासाठी उतरलेल्या चार शालेय मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. बार्शी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून या घटनेची नोंद झाली आहे.
स्नेहल नाना कसबे, अश्विनी हरिश्चंद्र खंडागळे, दीपाली तानाजी वाघमारे व मोहिनी चंद्रकांत सुपेकर अशी दुर्दैवी मृत मुलींची नावे आहेत. या चौघीजणी १४ वर्षे वयोगटातील होत्या. यातील स्नेहल कसबे, अश्विनी खंडागळे व दीपाली वाघमारे या तिन्ही मुली बार्शीतील दिलीप सोपल विद्यालयात तर मोहिनी सुपेकर ही ज्ञानेश्वर मठ विद्यालयात शिकत होती. या चौघीजणी मैत्री जपत घरातून फिरायला बाहेर पडल्या. फिरत फिरत अलीपूर रस्त्यावरील तिरकस पुलाजवळ ओढय़ात आल्या. ओढय़ात पाणी असल्यामुळे त्यात त्यांना पोहण्याची इच्छा झाली. त्याच वेळी पायी चालत जाणारे कुमार सोपान वाघमारे यांना या चारही मुली ओढय़ात उतरत असल्याचे दिसून आले. तेव्हा वाघमारे यांनी, त्यांना ओढय़ात पोहू नका, घरी परत जा, असे बजावले. वाघमारे हे पुढे जाऊन पुन्हा ओढय़ाजवळ परत आले असताना त्यांना उघडय़ावर मुलींचे काही कपडे व चपला दिसल्या. परंतु मुली दिसत नव्हत्या. त्यामुळे संशय बळावला. त्यातच एका मुलीचा मृतदेह आढळून आला.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वाघमारे यांनी परिसरातील तरुणांना मदतीसाठी हाक मारली. स्वत: कुमार वाघमारे यांच्यासह अतुल अर्जुन रसाळ व नाना कसबे यांनी मदतकार्य करून पाण्यातून चारही मुलींचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेची माहिती समजताच ओढय़ावर नागरिकांची गर्दी उसळली होती.