अहिल्यानगर: इ. १० वीच्या परीक्षेसाठी २३ तर इ. १२ वीच्या परीक्षेसाठी २० असे एकूण ४३ परीक्षा केंद्र जिल्ह्यात संवेदनशील ठरवले गेले आहेत. या केंद्रातील परीक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी आता जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पथके तैनात केली जाणार आहेत. याशिवाय कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी परीक्षा केंद्रातील हालचाली टिपण्यासाठी ‘वेब कास्टिंग’ परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांची सरमिसळ अशा काही उपाययोजनाही राबवल्या जाणार आहेत.
बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होईल, ती १८ मार्चपर्यंत चालेल तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीला सुरू होऊन १८ मार्चपर्यंत चालेल. या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर व कॉपीमुक्त अभियानासाठी उपाययोजनेकरता आज, शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीची बैठक झाली. माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, योजना शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, पोलीस उपअधीक्षक रवींद्र देशमुख, महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अधिकारी सुजाता नगराळे, ‘डायट’चे प्राचार्य राजेश बनकर आदी उपस्थित होते.
बारावीच्या परीक्षेसाठी ६२,८०९ परीक्षार्थी आहेत, त्यांच्यासाठी १२६ परीक्षा केंद्र आहेत, त्यातील २० संवेदनशील केंद्र आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी ७२,३१५ विद्यार्थी आहेत, त्यांच्या परीक्षेसाठी १८७ केंद्रात व्यवस्था करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या वितरण व्यवस्थेसाठी (कस्टोडियन) २१ केंद्र आहेत, त्यामध्ये नगर शहरात ४, संगमनेर ३, नेवासे २ व इतर तालुक्यात प्रत्येकी एक केंद्र आहे. बारावीसाठी सुमारे २६०० तर दहावीसाठी सुमारे ३ हजारांवर पर्यवेक्षक, कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.
परीक्षे आधीपासूनच दोन दिवस पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांनी परीक्षा केंद्रांच्या परिसरात गस्त सुरू करावी, सर्व परीक्षा केंद्रात सीसीटीव्हीची व्यवस्था करावी, महिला पथकासह आठ पथके तैनात करावीत आदी सुचनाही भंडारी यांनी बैठकीत दिल्या.
किती शाळांतून सीसीटीव्ही नाहीत?
दहावी व बारावीच्या परीक्षा वर्गातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सूचना राज्य परीक्षा मंडळाने केली आहे. बेलापूर येथील घटनेनंतर राज्य सरकारने सर्व शाळांमधून सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश दिले. मात्र अनेक शाळांमधून त्याची कार्यवाही झालेली नाही. काही शाळांनी वर्गांमधून सीसीटीव्ही बसवण्याऐवजी शाळेच्या आवारात, इमारतीच्या व्हरांड्यात सीसीटीव्ही बसवले आहेत. त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाकडून किती परीक्षा वर्गातून सीसीटीव्ही नाहीत, याचा शोध घेणे सुरू करण्यात आले आहे.
परिक्षार्थींची सरमिसळ
परीक्षा वर्गांवर नियुक्त करण्यात येणाऱ्या पर्यवेक्षकांची शिक्षक सरमिसळ (एका परीक्षा केंद्रातील शिक्षक दुसऱ्या परीक्षा केंद्रांवर) करण्यास शिक्षक संघटनांनी विरोध केला. त्यामुळे त्यांची मागणी राज्य परीक्षा मंडळाने मान्य केली. असे असले तरी विद्यार्थी परीक्षार्थींची मात्र सरमिसळ केली जाणार आहे. एका परीक्षा केंद्रातील परीक्षार्थींची व्यवस्था इतर ठिकाणी विभागण्यात आली आहे.

