केतन अग्रवाल या तरुणाची लोहगडावरुन ढकलून देत हत्या करण्यात आली. पुण्यातल्या या प्रकरणामुळे संपूर्ण पुणे जिल्हा आणि राज्य हादरलं आहे. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू आहे असं वाटलं होतं. मात्र केतनच्या होणाऱ्या पत्नीने म्हणजेच सिया गोयलने तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीसह संगनमत करुन हा कट आखला आणि केतनला ठार केलं असा आरोप आहे. या प्रकरणात आता विविध प्रकारचे खुलासे समोर येत आहेत. चेतन चौधरीच्या वडिलांनी माझा मुलगा निर्दोष आहे असा दावा केला आहे. तर आता चेतन आणि सिया हे दोघंही केतनची हत्या करण्यापूर्वी भेटले होते अशी माहिती समोर आली आहे तसंच दोघांमध्ये ४ हजार ४०० फोन कॉल्स झाल्याचंही समोर आलंय.
मागील सहा महिन्यांपासून संपर्कात होते सिया आणि चेतन
सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात ४ हजार ४०० फोन कॉल्स झाले होते. मागील सहा महिन्यात हे दोघं किती वेळा बोलले ही माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात सिया गोयल आणि केतन अग्रवाल या दोघांचा साखरपुडा झाला होता. मात्र सियाला केतनशी लग्न करायचं नव्हतं. त्यामुळे तिने बॉयफ्रेंड चेतनला बरोबर घेतलं आणि केतनच्या हत्येचा क्रूर कट शिजवला. सिया आणि केतन या दोघांचे जे व्हिडीओ व्हायरल होत आहेत त्यात हे दोघंही खूप खुश दिसत आहेत. सियाकडे पाहून असं वाटतही नाही की तिने इतक्या थंड डोक्याने असा की भयंकर कट आखला असेल. सिया आणि केतन यांचं लग्न उदयपूर या ठिकाणी होणार होतं. त्यासाठी जवळपास १६ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार होता. मात्र या सगळ्या गोष्टी घडण्यापूर्वीच सियाने केतनला मार्गातून हटवलं असा आरोप तिच्यावर आहे.
सिया आणि चेतनचे ४ हजार ४०० फोन कॉल्स
सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांच्यात मागील सहा महिन्यात एकूण ४ हजार ४०० फोन कॉल्स झाले आहेत. १८ जूनला केतनला लोहगडावरुन ढकलण्यात आलं. याबाबत पोलिसांनी माहिती दिल्याचं पीटीआयने म्हटलं आहे.
सिया आणि चेतन यांची १८ जूनला भेट?
सिया आणि चेतन चौधरी केतनच्या हत्येच्या दिवशी म्हणजेच १८ जूनच्या दिवशी एका कॅफेमध्ये भेटले होते अशी माहिती पीटीआयने दिली आहे. केतनला लोहगडावरच्या कुठल्या ठिकाणाहून ढकललं गेलं पाहिजे म्हणजे त्याचा जीव जाईल याची चर्चा या दोघांमध्ये झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे असंही पीटीआयने त्यांच्या वृत्तात म्हटलं आहे.
केतन अग्रवालचा पासपोर्ट हरवला
केतन अग्रवाल आणि सिया गोयल प्री वेडिंग शूटसाठी बालीला जाणार होते. १४ जून रोजी त्यांचं विमान होतं. पण विमानतळावर आल्यावर केतनचा पासपोर्ट सापडला नाही. पासपोर्ट कुठेतरी पडला असावा असं सिया म्हणाली. वास्तविक तिनेच तो लपवला होता आणि हरवल्याचा बनाव रचला होता अशी माहिती समोर आली. पासपोर्ट न सापडल्याने बालीची ट्रीप रद्द झाली.

सियाने प्रश्नांची उत्तर देण्यात केली टाळाटाळ
केतनच्या मृत्यूनंतर जेव्हा सिया गोयल केतनच्या कुटुंबाला भेटायला गेली तेव्हा त्यांनी काही प्रश्न तिला विचारले. त्याची उत्तरं तिला व्यवस्थित देता आली नाहीत. कुटुंबीयांचं हे म्हणणं होतं की लोहगडावर जर तू आणि तोच गेला होतास तर तुला उत्तरं का देता येत नाहीत? सुरुवातीला केतन सेल्फी घेताना पडला आणि दरीत कोसळला असं तिने सांगितलं. नंतर सियाने सांगितलं केतनकडे मी पाण्याची बाटली देत होते तेव्हा त्याचा पाय घसरला. तसंच केतन जिथून पडला ते ठिकाण सहजपणे दिसत नाही त्यामुळे कुटुंबीयांना सिया गोयलवर संशय आला आणि पुढे सगळा प्रकार उघड झाला. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
