scorecardresearch

राज्यातील ४,७०० वाहने चालवण्यास अयोग्य ; वाहन योग्यता प्रमाणपत्राशिवाय धावणाऱ्या वाहनांवर कारवाई

योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांविरोधात परिवहन आयुक्त कार्यालयाने ४ ते ६ एप्रिल या काळात विशेष मोहीम हाती घेतली होती.

मुंबई: रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, अवजड, जड यांसारख्या व्यावसायिक वाहनांना दोन वर्षांतून एकदा वाहन योग्यता प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. मात्र वाहनांची तपासणी व प्रमाणपत्र न घेताच राज्यात ४ हजार ७०० हून अधिक वाहने धावत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये मुंबईसह ठाणे, नाशिकमध्ये सर्वाधिक वाहने आहेत. योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांविरोधात परिवहन आयुक्त कार्यालयाने ४ ते ६ एप्रिल या काळात विशेष मोहीम हाती घेतली होती. या कारवाईदरम्यान ही वाहने दोषी आढळल्याचे परिवहन आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 

व्यावसायिक वाहनांना योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) घेणे आवश्यक असते. वाहनांचे ब्रेक कसे किंवा किती क्षमतेचे असावे. दिव्यांची प्रखरता किती व कशा पद्धतीची हवी, याबाबत काही नियम आहेत. त्यानुसार ब्रेक व दिव्यांच्या तपासणीबरोबरच एका स्वतंत्र ट्रॅकवर संबंधित वाहन नेमके चालते कसे, याचीही तपासणी करण्यात येते. फिटनेसची चाचणी घेणाऱ्या वाहन निरीक्षकांनी प्रत्यक्षात ते वाहन तपासून व आवश्यकतेनुसार त्याच्या चालविण्याचीही चाचणी घेतली जाते आणि त्यानंतरच वाहन योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. दोन वर्षांतून एकदा तपासणी होते. या प्रमाणपत्राशिवाय वाहन धावल्यास त्यावर आरटीओकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येतो.

१५ लाखांहून अधिक दंडवसुली

* वाहन योग्यता प्रमाणपत्राशिवाय धावणाऱ्या वाहनांविरोधात परिवहन आयुक्त कार्यालयाने ४ ते ६ एप्रिलदरम्यान राज्यात विशेष मोहीम राबविली होती.

* मोहिमेदरम्यान १९ हजार ७६४ वाहनांची तपासणी केली असता ४ हजार ७०१ वाहनांचे योग्यता प्रमाणपत्रच नसल्याचे निदर्शनास आले.

* योग्यता प्रमाणपत्र वैध, परंतु वाहन रस्त्यावर चालवण्यास सुस्थितीत नाही अशी आठ वाहने होती.

* त्यांच्यावर केलेल्या कारवाईत जवळपास १५ लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला.

* योग्यता प्रमाणपत्र नसलेली वाहने नाशिकमध्ये सर्वाधिक आढळली आहेत. त्यांची संख्या ४५१ आहे.

* मुंबई आरटीओअंतर्गत केलेल्या कारवाईत ३४५ वाहने, ठाण्यात २८८, नवी मुंबईत २०७, पिपंरी चिंचवडमध्ये २०५, जळगावमध्ये १५५, कोल्हापूरमध्ये १५० वाहने आढळली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 4 0 vehicles running in maharashtra state without fitness certificate zws

ताज्या बातम्या