लातूरसह राज्यातील तीन ठिकाणच्या जिल्हा रुग्णालयांसाठी ४८० कोटी मंजूर

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नवीन आरोग्य रुग्णालय उभारणीस मान्यता दिली आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

लातूर : लातूरसह राज्यातील यवतमाळ, धुळे, कोल्हापूर येथील जिल्हा रुग्णालयांसाठी प्रत्येकी १२० कोटींप्रमाणे ४८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नवीन आरोग्य रुग्णालय उभारणीस मान्यता दिली आहे. लातूरसह राज्यातील यवतमाळ, धुळे, कोल्हापूर येथे जिल्हा रुग्णालये सुरू होणार आहेत. या चार जिल्ह्य़ांच्या जिल्हा रुग्णालयांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रत्येकी १२० कोटी रुपयांप्रमाणे ४८० कोटी रुपये मंजूर केले. लातूर शहरातील नांदेड रोडवरील कृषी महाविद्यालयाशेजारी जिल्हा रुग्णालय उभारले जाणार आहे. लातूर जिल्हा रुग्णालय उभारणीसाठी राज्य सरकारने १२० कोटी रुपये मंजूर केले असून जिल्हा रुग्णालय उभारणीस लवकरच सुरुवात होईल. तसेच कार्डियाक कॅथलॅबसाठी १२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामुळे बऱ्याच वर्षांपासूनची मागणी अखेर मार्गी लागली.

कृषी महाविद्यालयाकडून जिल्हा रुग्णालयासाठी जागा खरेदी केली असून सद्य:स्थितीत कोविड १९ या संसर्गजन्य साथीच्या अनुषंगाने उपचारात आवश्यक बदल व अत्याधुनिक सुविधांकरिता निधीची आवश्यकता असल्याने आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेतले आहे. रुग्णालय बांधकाम, यंत्रसामुग्री, उपकरणे व मनुष्यबळ उपलब्ध करण्याकरिता राज्य शासनाकडून मागणीपेक्षा कमी प्रमाणात निधी मिळत असल्याने आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेण्यात आले आहे, असे शासन निर्णयात म्हटले आहे. एवढे दिवस लातूर जिल्ह्य़ासाठी जिल्हा रुग्णालय नव्हते. जिल्हा रुग्णालय व्हावे म्हणून अनेक दिवसांची मागणी होती. यासाठी उशिरा का होईना १२० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद राज्य सरकारने केली. त्यात कोविड-१९ ची साथ पसरल्याने आणखी विलंब लागला. आरोग्य सुविधांच्या अनुषंगाने सरकारने निधी उभारणी करून जिल्हा रुग्णालय सुरू करण्यासंबंधी शिक्कामोर्तब केले. निधी मंजुरी मिळाल्याने जिल्हा रुग्णालय बांधकामाच्या हालचाली वाढणार आहेत. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत मिळणाऱ्या निर्देशानुसार पुढील कार्यवाहीस प्रारंभ होईल.

लातूर जिल्हा रुग्णालयासाठी मंजूर झालेले १२० कोटी रुपये कशावर खर्च करायचे हे सरकारच्या सूचनांनुसार निश्चित केले जाणार आहे. लवकरच बांधकाम व यंत्रसामुग्री, उपकरणे, खरेदीबात मार्गदर्शन केले जाणार आहे.

 – डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा  शल्यचिकित्सक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 480 crore sanctioned for district hospitals at three places in the state including latur zws

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या