Discover the most popular tourist attractions near Tarkarli : कोकणच्या किनाऱ्यावर वसलेले तारकर्ली हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. जर तुम्ही तारकर्लीला भेट देण्याचे नियोजन करत असाल, तर केवळ समुद्रकिनाराच नाही तर आसपासची ५ महत्त्वाची पर्यटनस्थळे तुमची सहल संस्मरणीय बनवू शकतात. यामध्ये ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला, विलोभनीय देवबाग संगम आणि स्कुबा डायव्हिंगसाठी प्रसिद्ध असलेली ठिकाणे समाविष्ट आहेत. निसर्गसौंदर्य आणि साहसी खेळांची आवड असणाऱ्यांसाठी हे ५ स्पॉट्स म्हणजे पर्वणीच ठरेल.

महाराष्ट्रातील ‘मिनी मालदीव’ म्हणून ओळखले जाणारे तारकर्ली आता जागतिक स्तरावर पर्यटकांचे केंद्र बनले आहे. स्वच्छ निळे पाणी आणि पांढरी वाळू लाभलेल्या तारकर्लीच्या आजूबाजूला अशी काही ठिकाणे आहेत, जी पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात. ऐतिहासिक वारसा आणि निसर्गाचा अद्भुत संगम अनुभवायचा असेल, तर खालील ५ ठिकाणांना नक्की भेट द्या.

रॉक गार्डन

मालवणचे रॉक गार्डन हे तारकर्लीपासून अवघ्या ५-६ किमी अंतरावर असलेले एक अतिशय देखणे आणि शांत पर्यटन स्थळ आहे. मालवण नगरपरिषदेने विकसित केलेले हे उद्यान चिवला बीचच्या शेजारी, अरबी समुद्राच्या खडकाळ किनाऱ्यावर वसलेले आहे. हे उद्यान एका खडकाळ किनाऱ्यावर बांधले गेले आहे. लाटांच्या सततच्या आदळण्यामुळे तयार झालेले अद्वितीय खडक हे येथील मुख्य आकर्षण आहे. इथून समुद्रात मावळणारा सूर्य पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. संध्याकाळी पर्यटकांची येथे मोठी गर्दी असते.

पदमगड किल्ला

पदमगड (Padmagad) हा सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवणजवळ असलेला एक महत्त्वाचा ऐतिहासिक सागरी किल्ला आहे. अनेकदा लोक याला रायगड जिल्ह्यातील ‘पद्मदुर्ग’ समजतात, परंतु हे दोन्ही किल्ले वेगवेगळे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुख्य सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी त्याच्या आसपास एक ‘किल्ल्यांची साखळी’ तयार केली होती, ज्यामध्ये पदमगड, राजकोट आणि सर्जेकोट या किल्ल्यांचा समावेश होतो. शिवकाळात पदमगडचा वापर मुख्यत्वे जहाज बांधणीसाठी (Shipbuilding Yard) केला जात असे. महाराजांच्या आरमारातील लहान मोठी जहाजे या ठिकाणी बांधली आणि दुरुस्त केली जात असत. तारकर्लीपासून अवघ्या तीन किमी अंतरावर हा किल्ला आहे.

कोलंब बीच

कोलंब बीच (Kolamb Beach) हे मालवणमधील एक अत्यंत शांत, स्वच्छ आणि तुलनेने कमी गर्दीचे सुंदर पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण मालवण शहरापासून साधारण ३-४ किमी अंतरावर आहे.तर तारकर्लीपासून ५ किमी अंतरावर आहे. या बीचचे मुख्य आकर्षण म्हणजे एका बाजूला अथांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला कोलंब खाडी. जिथे ही खाडी समुद्राला मिळते, तो ‘क्रीक’ (Creek) परिसर अतिशय नयनरम्य आहे.तारकर्ली किंवा चिवला बीचच्या तुलनेत येथे पर्यटकांची वर्दळ कमी असते. त्यामुळे ज्यांना गोंधळापासून दूर, शांत वातावरणात वेळ घालवायला आवडते, त्यांच्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.नशिबाने साथ दिली तर पहाटेच्या वेळी इथून समुद्रात डॉल्फिन उड्या मारताना दिसू शकतात.

त्सुनामी आयलंड

त्सुनामी आयलंड (Tsunami Island) हे मालवण-देवबाग येथील कर्ली नदीच्या पात्रात वसलेले एक वैशिष्ट्यपूर्ण बेट आहे. पर्यटनासाठी हे कोकणातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक मानले जाते. २००४ मध्ये आलेल्या त्सुनामीच्या लाटांमुळे समुद्राच्या तळातील मोठ्या प्रमाणात वाळू या ठिकाणी साचली आणि हे बेट अधिक स्पष्टपणे तयार झाले, म्हणूनच याला ‘त्सुनामी आयलंड’ असे नाव पडले असं म्हटलं जातं. हे बेट नेहमी जमिनीसारखे नसते. भरतीच्या वेळी हे बेट पूर्णपणे पाण्याखाली जाते, तर ओहोटीच्या वेळी ते जमिनीच्या रूपात बाहेर येते. हे ठिकाण वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध आहे. येथे पॅरासेलिंग, कयाकिंग, बनाना राईड, जेट-स्की आणि बंपर राईड यांसारखे अनेक खेळ खेळता येतात.देवबाग किनार्यावरून या बेटावर जाण्यासाठी बोटी उपलब्ध आहेत. साधारणपणे एका बोटीचे भाडे ३०० ते १००० रुपयांपर्यंत असू शकते. तर तारकर्लीवरून साधारण ४ ते ५ किमी अंतरावर आहे. तुम्ही तारकर्लीच्या जेटीवरून (बंदर) सुद्धा बोट ठरवू शकता. ही बोट तुम्हाला कर्ली नदीच्या बॅकवॉटरमधून फिरवत त्सुनामी आयलंडला नेते. हा प्रवास अधिक निसर्गरम्य असतो आणि यात संगम (नदी आणि समुद्राचे मिळण्याचे ठिकाण), क्रोकोडाईल पॉईंट आणि डॉल्फिन दर्शन यांचा समावेश असतो.

धामापूर तलाव

धामापूर तलाव हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक अतिशय निसर्गरम्य आणि ऐतिहासिक तलाव आहे. या तलावाला मिळालेल्या जागतिक मान्यतेमुळे याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. २०२० मध्ये या तलावाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन स्ट्रक्चर’ (World Heritage Irrigation Structure) हा बहुमान मिळाला आहे. हा तलाव घनदाट जंगलाने आणि माड-पोफळीच्या बागांनी वेढलेला आहे. याचे पाणी स्फटिकासारखे स्वच्छ असून काही वेळा तलावाचा तळही दिसू शकतो. तलावाच्या काठी ५०० वर्षे जुने श्री देवी भगवतीचे प्राचीन मंदिर आहे. तसंच, येथे पॅडल बोट आणि स्पीड बोटची सुविधा उपलब्ध आहे.