सांगलीत चाचणीची कारवाई

सांगली : करोना संसर्गाची गती वाढली असताना निर्बंधांचे पालन न करता बाजारात हिंडणाऱ्यांना आळा घालण्यासाठी बुधवारी मिरजेत प्रतिजन चाचणी घेतली असता ६५ पैकी ५ जण बाधित असल्याचे आढळून आले. यामुळे पोलिसांनीही विनाकारण बाहेर पडणाऱ्यांविरुद्ध खंबीर भूमिका घेतली असून आज शहराला जोडणाऱ्या रस्त्यावरचे चौकी पहारे अधिक कडक करण्यात आले.

मिरजेतील मैदान दत्त मंदिर येथे बुधवारी भाजीविRे त्यांनी ठाण मांडले होते. भाजी खरेदीसाठीही मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. वारंवार सूचना देउनही विRे ते आणि ग्राहक दुर्लक्ष करीत असल्याने पोलीस आणि महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत अकारण रस्त्यावर आलेल्यांची प्रतिजन चाचणी चौकामध्येच घेण्यात आली. या वेळी ६५ जणांची तपासणी केली असता यापैकी पाच जण बाधित असल्याचे आढळून आले. यांना करोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. या सर्वाची नोंदणी करीत तत्काळ गृह विलगीकरणात राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या.

या दरम्यान, बाजारामध्ये विना मुखपट्टीचा वावर असलेल्यांची धरपकड करण्यात येत असतानाच पाच जण बाधित असल्याचे आढळल्याने पोलीस आणि महापालिका कर्मचाऱ्यांचीही त्रेधा उडाली. भाजीपाला, धान्य खरेदीसाठी शेकडो नागरिक आणि वाहन धारक रस्त्यावर फिरत आहेत. वारंवार सूचना देऊनही मोकाट हिंडणाऱ्यांची तत्काळ प्रतिजन चाचणी करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी सांगितले.

दरम्यान, शहरालगतच्या गावामधून येणाऱ्यांची कठोरपणे चौकशी करण्यात येत आहे. सुभाषनगर येथे शहरात येत असलेल्या नागरिकांना अडवून अत्यावश्यक काम असेल, तरच शहरत प्रवेश दिला जात होता. प्रत्येक दुचाकी स्वाराची विचारणा पोलिसांकडून केली जात होती.