रत्नागिरी : जून महिना अर्धा उलटून गेला तरी मान्सूनने जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याने रत्नागिरी जिल्ह्यावर अभूतपूर्व पाणीसंकट ओढवले आहे. जिल्ह्यातील लोटे व मिरजोळे औद्योगिक वसाहतींतील कारखान्यांवर पाणी संकट ओढावले आहे. वस्तीगृहात राहणा-या विद्यार्थ्यांना घरी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच हजारो कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवार उभी राहिली आहे.

शहरांसह ग्रामीण भागात पाण्याचे स्रोत आटू लागले असून अनेक ठिकाणी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. वाढत्या संकटाचा फटका आता थेट उद्योग, शिक्षण आणि रोजगार क्षेत्राला बसू लागला असून जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक वसाहतींमधील अनेक कारखाने बंद पडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत.

जिल्ह्यात लोटे परशुराम, मिरजोळे तसेच इतर औद्योगिक वसाहतींतील उद्योगांना उत्पादनासाठी दररोज हजारो लिटर पाण्याची आवश्यकता असते. विशेषतः मत्स्यप्रक्रिया उद्योग, रासायनिक कारखाने आणि उत्पादन क्षेत्रातील कंपन्या पाण्यावर पूर्णतः अवलंबून आहेत. मात्र उपलब्ध जलसाठे झपाट्याने कमी होत असल्याने उद्योगांना आवश्यक पाणीपुरवठा मिळणे कठीण झाले आहे. परिणामी काही उद्योगांनी उत्पादन कमी केले असून काहींनी कामगारांना तात्पुरती सुट्टी घेण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर येत आहे.

जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या परगावच्या विद्यार्थ्यांनाही संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर घरी परतण्याच्या सूचना देण्यात आल्याची चर्चा आहे. वसतिगृहे आणि भाड्याच्या निवासस्थानी पाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन शैक्षणिक संस्था सतर्क झाल्या आहेत.

रत्नागिरी, चिपळूण, राजापूर आणि खेड या प्रमुख शहरांमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. धरणे, तलाव आणि विहिरींतील पाणीसाठा धोकादायक पातळीपर्यंत खाली गेल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. दुसरीकडे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचेही धाबे दणाणले असून खरीप हंगामाचे नियोजन संकटात सापडले आहे.

जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) आठ प्रमुख औद्योगिक वसाहती कार्यरत आहेत. मिरजोळे, लोटे परशुराम, खेर्डी -चिपळूण, गणे-खडपोली, देवरुख, दापोली (वळणे), गुहागर आणि संगमेश्वर या औद्योगिक पट्ट्यांमध्ये शेकडो उद्योग सुरू आहेत. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या जिल्हानिहाय नोंदीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात ४०८ नोंदणीकृत कारखाने असून त्यामध्ये सुमारे ३३ हजारांहून अधिक कामगार कार्यरत आहेत. पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाल्यास या हजारो कामगारांच्या रोजगारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅस सिलिंडर तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसाय आणि अनेक उद्योग अडचणीत आले होते. त्यावेळी अनेक कामगारांना गावी परतावे लागले होते. आता पाणीसंकटामुळे तशाच परिस्थितीची पुनरावृत्ती होण्याची भीती उद्योग क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत  यांनी एमआयडीसीमार्फत पर्यायी पाणीपुरवठ्याचे संकेत दिले असले तरी उद्योग आणि नागरिकांना तातडीच्या उपाययोजनांची अपेक्षा आहे. मात्र सद्या पालकमंत्री उदय सामंत हे राज्यात सुरु असलेल्या ऑपरेशन टायगर मध्ये व्यस्त असल्याने जिल्ह्याच्या पाणी टंचाईकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न जिल्हा वासियांना पडला आहे.

पावसाचा विलंब, घटणारे जलसाठे आणि वाढते औद्योगिक दडपण यामुळे रत्नागिरीसमोरील पाणीसंकट दिवसेंदिवस गंभीर बनत असून प्रशासन आणि शासनाची पुढील पावले काय असतील, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

४०८ कारखाने, ३३ हजार कामगार संकटाच्या छायेत

जिल्ह्यात ८ प्रमुख औद्योगिक वसाहती कार्यरत

४०८ नोंदणीकृत कारखाने सुरू

३३,०६५ हून अधिक कामगार कार्यरत

अनेक शहरांत एक दिवसाआड पाणीपुरवठा

उद्योग, शिक्षण आणि शेती क्षेत्रावर थेट परिणाम

पाऊस लांबल्याने जलसाठे तळाला जाण्याची भीती

रोजगार आणि उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता

रत्नागिरीतील मत्स्य प्रक्रिया करणा-या कंपनीला मोठ्या प्रमाणावर पाणी लागत आहे. मात्र आता पाणी पुरवठा कमी होत असल्याने उत्पादन ही कमी होत आहे. यामुळे कंपनीचे काम कमी होवू लागल्याने रोजगार जाण्याची भीती वाटू लागली आहे. राजेश यादव, कामगार, रत्नागिरी औद्योगिक वसाहत.

एमआयडीसी लोटे परिसरातील १९ गावांसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी आवश्यक नियोजन सुरू आहे. गरज भासल्यास जवळच्या उपलब्ध स्रोतांमधून टँकरद्वारेही पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. सध्या औद्योगिक वापरासाठी पाण्याची टंचाई जाणवत असली, तरी प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून नागरिकांना आवश्यक पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मनुज जिंदल, जिल्हाधिकारी, रत्नागिरी