अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरात धाडसी चोरी करत ५१ तोळे सोने आणि दोन किलो चांदी लुटणाऱ्या सहा आरोपींना नगरच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडून सुमारे २६ लाख रुपये किमतीचे जवळपास सर्व दागिने हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.

सुयोग अशोक दवंगे (वय २१, रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), संदीप किसन साबळे (वय २३, रा. पाचपट्टावाडी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर), संदीप निवृत्ती गोडे (वय २३, रा. सोमठाणे, ता. अकोले, जि. अहिल्यानगर), अनिकेत अनिल कदम (वय २१, रा. टिटवाळा, ता. कल्याण, जि. ठाणे), दीपक विलास पाटेकर (वय २४, रा. टिटवाळा, ता. कल्याण, जि. ठाणे) व सचिन दामोदर मंडलिक (वय २९, रा. संगमनेर, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे असून त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. चोरी केलेले दागिने अहिल्यानगर येथे विक्रीसाठी घेऊन जात असताना लोणी कोल्हार मार्गावर पोलिसांनी कारसह त्यांना ताब्यात घेतले. आरोपींनी संगमनेरसह आणखी काही ठिकाणच्या मंदिरात चोऱ्या केल्या असल्याच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. आठवडाभराच्या आतच या जबरी चोरीचा छडा लावत आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

गेल्या शनिवारी रात्री संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मीच्या मंदिरात ही चोरी झाली होती. चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा व गाभाऱ्याचे कुलूप तोडून देवीच्या मूर्तीचे चांदीचे टोप, चांदीच्या टोपामधील सोन्याचे पान, मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व इतर सोन्याचे दागिने असे सुमारे ५१ तोळे सोन्याची व दोन किलो चांदीचे दागिने चोरून नेले होते. या संदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने देखील भेट देऊन तपास सुरू केला होता.

पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार सागर ससाने, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, सुनील मालनकर, भगवान थोरात, फुरखान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, अरुण मोरे यांचे पथक आरोपींच्या शोधात होते. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचा आधारे सदरचा गुन्हा हा संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील सुयोग दवंगे याने त्याच्या साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले होते. आरोपींच्या मागावर असलेल्या पथकाला सुयोग दवंगे हा त्याचा साथीदार सचिन मंडलिक यांच्या मदतीने चोरलेले दागिने विक्री करण्यासाठी एका कारमधून संगमनेरहून लोणी मार्गाने अहिल्यानगर येथे जाणार असल्याची माहिती मिळाली होती.

त्यामुळे पथकाने लोणी-कोल्हार रस्त्यावर सापळा लावला होता. पथकातील कर्मचाऱ्यांनी संशयित कार (एम.एच. ०४ एच.एफ १६६१) अडवली. पोलिसांनी पकडल्याचे लक्षात येतात कारमधील तिघेजण पळून जाऊ लागले, मात्र पथकातील काही जणांनी पाठलाग करून त्यांना पकडले. पळणाऱ्या तिघांसह कारमधील आणखी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून सुमारे २६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींकडे चौकशी केली असता काकडवाडी मंदिरातील चोरी साथीदारांच्या मदतीने केल्याची कबड्डी दिली. याशिवाय याच आरोपींनी काकडवाडी घटनेपूर्वी दोन दिवस अगोदर गुरुवारी (६ मार्च) कुंदेवाडी, सिन्नर जि. नाशिक येथील बालाजी मंदिर व सिन्नरच्या पुणे-नाशिक रस्त्यावरील वज्रेश्वरी मंदिरात चोरी केल्याची तसेच चोरी केलेले दागिने सचिन मंडलिक यांच्या मध्यस्थीने विक्री करण्यासाठी अहिल्यानगर येथे नेत असल्याचे कबूल केले. पकडलेल्या सर्व आरोपींना संगमनेर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Story img Loader