गडचिरोली : सामान्य नागरिकात दहशत निर्माण करण्यासाठी नक्षलवादी पोलीस खबरी असल्याचे कारण देत निरपराध इसमांची निर्घृणपणे हत्या करतात. आजपर्यंत नक्षलवाद्यांनी पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून तब्बल ५२२ इसमांचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी न घाबरता नक्षलवाद्यांना गावबंदी मोहीम अधिक तीव्र करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.

नक्षलवादी नेहमी खोटे अप्रचार करून सामान्य जनतेची दिशाभूल करण्याकरिता सामान्य इसमांचा खून करून तो पोलीस खबऱ्या असल्याची बतावणी करतात. नक्षलवाद्यांना गडचिरोली जिल्हय़ातील विकासाला नेहमीच विरोध केला आहे. जिल्हय़ात रस्ते, पूल बांधकाम सुरू असल्यास त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या वाहनांची जाळपोळ करणे, कामगारांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्याचे काम नक्षलवादी वारंवार करतात. दादापूर येथे राज्य महामार्गाचे बांधकाम चालू असताना नक्षलवाद्यांनी ३६ वाहने व यंत्रसामुग्री जाळून खाक केली होती.