जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पोपटराव बनसोडे यांनी बडगा उगारताच जिल्ह्य़ात ५६५ ग्रामपंचायतींचा कारभार ऑनलाईन झाला. अवघ्या ९० दिवसांत तब्बल ३५ हजार प्रमाणपत्रे वाटप झाली. ही कामगिरी करताना जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.
राज्यातील ग्रामपंचायती ऑनलाईन करून त्याद्वारे गावकऱ्यांना प्रमाणपत्र देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यासाठी ग्रामपंचायतींना दिलेला निधी व त्यातून झालेला खर्च, तसेच ग्रामपंचायतीतील विकासकामे याची माहिती एका क्लिकवर मिळणार असल्याने जिल्ह्यात सुमारे ३०० ग्रामपंचायतींनी पुढाकार घेत काम सुरू केले. उर्वरित ग्रामपंचायतींनी हे काम करण्यास दिरंगाई केली. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाकडून तीव्र नाराजी व्यक्त करून ‘सीईओ’ बनसोडे, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी संबंधित ग्रामसेवकांना पत्र पाठवून कारवाईचा बडगा उगारला होता.
या बडग्याची मात्रा लागू पडून उर्वरित ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवक व संग्राम कक्षातील कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र एक करून ग्रामपंचायती ऑनलाईन केल्या. सर्व दस्तावेज ऑनलाईन करून प्रमाणपत्र देण्यास प्रारंभ केला. अवघ्या ९० दिवसांत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी तब्बल ३५ हजार ऑनलाईन प्रमाणपत्र वाटप करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. आता यापुढे सर्व ग्रामपंचायतमधून ऑनलाईन प्रमाणपत्रे वाटप करण्याच्या सूचना जि. प. प्रशासनाने दिल्या आहेत.