सावंतवाडी : सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात सध्या सहा हत्तींचा वावर असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. या हत्तींपैकी एक असलेला ‘ओंकार’ हत्ती बांदा आणि वाफोली परिसरात सक्रिय आहे, तर ‘बाहुबली’ हत्ती आंबोलीत आणि चार हत्तींचा कळप दोडामार्ग तालुक्यातील तिलारी भागात दाखल झाला आहे. ‘ओंकार’ हत्तीला पकडण्याच्या शासकीय निर्णयावरून मात्र मोठा वादंग निर्माण झाला आहे.
’ओंकार’ हत्तीला ‘वनतारा’कडे न देण्याची मागणी :
एका शेतकऱ्यावर हल्ला केल्यामुळे शासनाने ‘ओंकार’ हत्तीला पकडण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठातील सुनावणीनंतर पुढील कार्यवाहीची दिशा ठरणार आहे. याचदरम्यान, ‘ओंकार’ला वनतारा संस्थेच्या ताब्यात देऊ नये, असा दबावगट तयार होत आहे.बांदा येथे गुणेश गवस यांनी ‘ओंकार’ला नैसर्गिक अधिवासात सोडण्याच्या मागणीसाठी उपोषण केले. यावेळी साईप्रसाद कल्याणकर, शाम धुरी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. वन विभागाने हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगून कोणतेही आश्वासन देण्यास नकार दिला आहे.
कोल्हापूर कॅम्पची तयारी धिम्या गतीने:
वन विभागाने ‘ओंकार’ला ठेवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील घाटकर नगर येथे कॅम्प (शिबिर) तयार करण्याची घोषणा केली आहे. मात्र, या कॅम्पच्या दृष्टीने अद्याप हालचाली सुरू झालेल्या नाहीत. या दिरंगाईमुळे ‘ओंकार’ हत्तीला तात्पुरते वनतारा पकडून नेण्याची आणि कोल्हापूर कॅम्प तयार झाल्यावर परत आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
न्यायालयात प्रतिज्ञापत्र:
हत्तींच्या वावरासंदर्भात आणि त्यांच्यावरील उपाययोजनांबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडे याचिका दाखल करण्यात आली आहे.
वन विभाग १४ नोव्हेंबरपर्यंत ‘ओंकार’ हत्तीला का पकडण्यात येणार आहे आणि त्यासाठीची पुढील योजना काय आहे, यासंदर्भात सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे.
पर्यावरणप्रेमींची मागणी :
प्राणीमित्र आणि पर्यावरणप्रेमी ‘ओंकार’ हत्तीला वनतारा कडे न देता, त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी करत आहेत. तसेच, ‘ओंकार’चे कुटुंब ज्या कळपात आहे, त्याच कळपात त्याला परत सोडावे, अशी मागणीही जोर धरत आहे. सध्या आंबोली, वाफोली आणि तिलारी परिसरात हत्तींचा वावर वाढला आहे. भात पिकाची कापणी आणि मळणी सुरू आहे.बागायती आणि वायंगणी शेतीची कामेही सुरू आहेत.हत्तींच्या अचानक वावराने शेतीत मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे.
