करोना काळात आजीबाईंचा ज्येष्ठांना आधार

दीडशे जणांना दोन वेळचा मोफत जेवणाचा डबा

दीडशे जणांना दोन वेळचा मोफत जेवणाचा डबा

विरार :   सर्वत्र करोना वैश्विक महामारीने कहर माजवला आहे. अनेकांचे रोजगार गेले. यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यात सातत्याने वाढत जाणारी टाळेबंदी यामुळे शहरातील निराधार ज्येष्ठ नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत  नालासोपारा येथील एका ६३ वर्षीय आजीने या ज्येष्ठ नागरिकांना आधार दिला आहे. एका सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ही आजी शहरातील १५० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांना दोन वेळचा जेवणाचा डबा मोफत देत आहे.

मागील वर्षभरापासून करोनाने अनेकांचे  हाल केले आहेत. हजारो काम करणारे हात बेरोजगार झाले आहेत. त्यात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांवर काय संकट कोसळले असेल. याचा विचार करत श्री आदी जिन युवक चेरिटेबल ट्रस्ट या सेवाभावी संस्थेने पुढाकार घेत मागील वर्षभरापासून अशा नागरिकांचा शोध घेत त्यांच्या जेवणाची जबादारी उचलली आणि नालासोपारा येथे ६३ वर्षीय शारदा चौहान या महिलेमार्फत टिफिन सेवा सुरू केली. यासाठी संस्थेचे नालासोपारा येथील सदस्य हिमांशू हिंगू आणि त्यांची पत्नी यांनी या नागरिकांचा शोध घेत सध्या १५० नागरिकांना सेवा दिली जात आहे.

हिमांशू यांनी सांगितले की, ६३ वर्षीय आजी शारदा चौहान या एकटय़ा या सर्वांचे जेवण बनवितात. त्यांना मदतीला केवळ पोळ्या लाटण्यासाठी दोन महिला येतात. बाकी डाळ, भात, भाजी आणि एक गोड पदार्थ त्या दरोरज बनवत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या कार्यात त्यांना मदत करणारे रमेश भाई (५३) हे सर्व डबे सायकलवर घेऊन संपूर्ण शहरभर फिरून या ज्येष्ठ नागरिकांच्या घरोघरी  जावून देत आहेत, तर रिकामे डबे पुन्हा परत घेऊन येत आहेत.

श्री आदी जिन युवक चॅरिटेबल ट्रस्ट के संचालक जयेश भाई शाह (जरीवाला) यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा चालवली जात आहे. मागील वर्षभरापासून ही सेवा अखंडित सुरू आहे. शारदा चौहान आणि रमेश भाई एक दिवसही दांडी न मारता सेवाभावे हे काम करत आहेत.

शारदा यांची दोन मुली आणि एक सून यांचे १५ वर्षांपूर्वी  आजारपणामुळे निधन झाले होते. तेव्हापासून त्यांनी आपले पती आणि तीन नातवांचा साभाळ केला. पण करोना काळात त्यांना कुठेच काम मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. दरम्यान श्री आदी जिन युवक चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेने मदतीचा हात दिला. आणि आज शारदा चौहान यांच्या हातून १५० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांना मोफत जेवण दिले जात आहे. यांचा त्यांना खूप आनंद होत असून ही ईश्वराची सेवा आहे असे त्यांनी सांगितले.

अडचण दूर झाली

करोना काळाच्या सुरुवातीला टाळेबंदीत या संस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिकांना मोफत धान्य दिले जात होते. पण नंतर लक्षात आले की, ज्येष्ठ नागरिक त्यांना जेवण बनविताना अनेक अडचणी येत असल्याने हिमांशू यांनी त्यांना तयार जेवणाचे डबे देण्याचे ठरविले.  याच वेळी शारदा चौहान यांच्या घरीसुद्धा धान्य देण्यासाठी गेले असता शारदा यांनी त्यांच्याकडे काम मागितले आणि  अशा पद्धतीने हे कार्य सुरू झाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 63 year old woman give free two time food for more than 150 senior citizens zws