लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला  जिल्ह्यात ६६.३९ टक्के रुग्णांनी करोनावर मात केली आहे. गत दोन दिवसांत ६१ जणांना सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात मंगळवारी आणखी एका करोनाबाधित रुग्णाचा बळी, तर एका नवीन रुग्णाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ६७ जणांचा मृत्यू झाला असून एकूण रुग्ण संख्या १२४४ झाली.

जिल्ह्यात करोना संसर्ग वेगाने पसरला. मृत्यूचे प्रमाणही कमालीचे वाढले. मंगळवारी रुग्ण वाढीचा वेग मंदावल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील एकूण ११० तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी १०९ अहवाल नकारात्मक, तर एका जणाचा अहवाल सकारात्मक आला. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १२४४ वर पोहचली. सध्या ३५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज पहाटे ३ वाजता बाळापूर येथील रहिवासी ५० वर्षीय महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना १२ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आज सकाळच्या अहवालात सकारात्मक आढळून आलेली महिला रुग्ण ही शहरातील दगडीपूल भागातील रहिवासी आहे. सायंकाळच्या अहवालात एकही सकारात्मक रुग्ण आढळून आला नाही. शासकीय वैद्याकीय महाविद्याालयातून आज दिवसभरात १३ जणांना सुट्टी देण्यात आली. त्यात १० पुरुष व तीन महिला आहेत. त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्याापीठात स्थापन करण्यात आलेल्या कोविड केअर केंद्रातून दोन दिवसांत ४८ जणांना सोडण्यात आले. एकूण ६१ जणांना सुट्टी देण्यात आली आहे. हे सर्व जण शहर व जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातील रहिवासी आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८९३२ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ८५९६, फेरतपासणीचे १३६ तर वैद्याकीय कर्मचाऱ्यांचे २०० नमुने होते. आजपर्यंत एकूण ८८७२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण नकारात्मक अहवालांची संख्या ७६२८, तर सकारात्मक अहवाल १२४४ आहेत. शहरात महापालिकेकडून नमुने संकलन केंद्र वाढविण्यात आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ८२६ रुग्णांनी करोनावर मात केली. त्याचे प्रमाण ६६ टक्क्यांच्यावर आहे. जिल्ह्यात करोनातून बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी वाढत असलेला मृत्यूदर चिंताजनक ठरत आहे.

एका दिवसाच्या खंडानंतर पुन्हा मृत्यू
जिल्ह्यात काल मृत्यूची नोंद झाली नव्हती. त्यामुळे आता मृत्यू थांबतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत असतांनाच आज पुन्हा करोनामुळे एका रुग्णाचा बळी गेला. २२ जूनचा अपवाद वगळता गेल्या १८ दिवसांत ३३ करोनाबाधित रुग्ण दगावले आहेत. आतापर्यंत ६७ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात एका आत्महत्येचा समावेश आहे.