साईसंस्थान परिसरात आपल्या कुटुंबासह झोपलेल्या महिलेच्या पुढय़ातून गुरुवारी रात्री सात महिन्यांचे बालक अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. हे कुटुंब मध्य प्रदेशातील आहे. या प्रकाराने शिर्डीत खळबळ उडाली आहे.  
संगीता जगदीश राठोड (वय ३५, राहणार नवीन बिजलपूर, इंदौर) ही महिला कुटुंबीयांसह रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने साईदर्शनासाठी शिर्डीत आली होती. संगीताचा पती मालमोटार चालक असून तो या सर्वाना शिर्डी येथे सोडून सातारला गेला. गेल्या दोन दिवसांपासून हे कुटुंब दिवसभर मंदिर परिसरात फिरून दर्शन करून रात्री जुन्या साईप्रसाद इमारतीजवळील लाडू काऊंटरजवळ संस्थानने उभारलेल्या शामियान्यात झोपत होते. या महिलेला तीन मुली व एक मुलगा आहे. यातील सात महिने वयाचा मुलगा विराट याला काल पळवून नेण्यात आले.
गुरुवारी रात्री हे कुटुंब झोपण्यासाठी गेले. रात्री ११ वाजता संगीता यांनी आपल्या विराट या मुलाला दूध पाजून आपल्यासमोर झोपवले. त्यांनाही नंतर झोप लागली. अध्र्या-एक तासाने त्यांना जाग आली असता पुढय़ात मूल नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे येथे एकच गोंधळ उडाला. संगीता यांनी लगेचच शिर्डी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी या कुटुंबाला बरोबर घेऊन रात्रभर मंदिर परिसर, रेल्वे, बसस्थानक आदी भाग िपजून काढला, मात्र या सात महिन्यांच्या मुलाचा काही शोध लागला नाही. संगीता राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तीन मुलींनंतर झालेला विराट हा मुलगा हरवल्याने आईचा आक्रोश उपस्थितांचे काळीज हेलावणारा होता.
(संग्रहित छायाचित्र)