Tragic 1944 Bombay Dock explosion history: मुंबईची १९४४ सालातील १४ एप्रिलची दुपार भयंकर होती. मुंबईला (तेव्हाचे बॉम्बे) लागोपाठ दोन स्फोटांनी हादरवून टाकले. त्यानंतर तीन दिवस ही आग विझवण्यात गेले. मुंबई बंदरात झालेल्या दोन स्फोटानंतर एकूण ७४० जणांचा मृत्यू झाला होता. ज्यात ४७६ लष्करी जवान होते. तर या घटनेत १,८०० जण जखमी झाले. तर २७ जहाजे बुडाली. आगीमुळे पाच लाख टन ढिगारा हटविण्यासाठी आठ हजारांहून अधिक लोकांनी सात महिने रात्रंदिवस काम केले होते.

या घटनेचे स्मरण म्हणून मुंबई अग्निशमन दलाने (MFB) १४ एप्रिलपासून अग्निशमन सेवा सप्ताह सुरू केला. दरवर्षी अग्निशमन दलाकडून ही मोहीम राबवली जाते. मुंबईतील अग्निसुरक्षा उपायांबद्दल जागरूकता वाढवणे यासाठी विविध उपक्रम आणि प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो. फक्त मुंबईच नाही तर देशभरातील तब्बल २,५६१ अग्निशमन केंद्रांद्वारे ही मोहीम राबवली जाते. राष्ट्रीय स्तरावरही हा आठवडा अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून ओळखला जातो.

बॉम्बे डॉक स्फोट

१९४४ साली दुसरे महायुद्ध ऐनभरात असताना ब्रिटिश मालवाहू जहाज ‘एसएस फोर्ट स्ट्राइकिन’ इंग्लंडहून मुंबईला येण्यासाठी निघाले. जपानी सैन्यावर हल्ला करण्यासाठी दारुगोळा आणि रसद भरण्याकरिता २० जहाजांचा नौदल ताफा आशियाई समुद्राकडे येत होता. हे मालवाहू जहाजही याच ताफ्याचा भाग होते.

SS Fort Stikine
‘एसएस फोर्ट स्ट्राइकिन’ मालवाहू जहाज

एसएस फोर्ट स्ट्राइकिन मालवाहू जहाजावर दारुगोळा आणि स्फोटके यांच्यासह सोन्याच्या विटा आणि एक छोटे लढाऊ विमानही होते. मुंबईला येत असताना जहाजाने ३० मार्च रोजी कराची येथे थांबा घेतला. यावेळी जहाजात विमान, सोन्याच्या विटा आणि १४०० टन स्फोटके होती. राष्ट्रीय अभिलेखागाराच्या नोंदीनुसार हा माल मुंबईत उतरविण्यात येणार होता. यातील बराचसा माल कराची येथे उतरविला गेला.

या घटनेचा व्हिडीओ खाली दिलेला आहे.

कराचीमध्ये भरलेला माल आग लागण्यास कारणीभूत

कराची बंदरावर जहाजातील माल उतरविल्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरण्यासाठी कापूस, तेल, लोखंड, माशांचे खत आणि गंधक जहाजात भरले गेले. या सर्व वस्तू ज्वलनशील असून त्या जहाजात ठेवणे नियमांच्या विरोधात होते.

१२ एप्रिल रोजी मालवाहू जहाज मुंबईच्या व्हिक्टोरिया बंदरात आले. दुसऱ्या दिवसापासून माल उतरविण्यास सुरुवात झाली. अभिलेखागारातील नोंदीमध्ये नमूद केल्यानुसार, माशांचे खत आणि तेलाचे ड्रम, यापैकी काहींना गळती लागली होती. हा माल उतरविण्यास झालेला विलंब स्फोट होण्याचे पहिले कारण असल्याचे सांगितले जाते.

नोंदीनुसार, दुसऱ्या दिवशी एकूण १३ जहाजातील सामान उतरविण्याचे काम सुरू होते. शेजारच्या प्रिन्स बंदरात आणखी दहा जहाजे होती. १४ एप्रिल रोजी दुपारी, सामान उतरविणाऱ्या हमालांनी दुपारच्या जेवणाची सुट्टी घेतली होती. त्याचबरोबर मालवाहू जहाजाजवळ असलेल्या पहारेकऱ्यांनीही जेवणासाठी विश्रांती घेतली. ही बाब कॅप्टन, त्यांचे अधिकारी आणि जहाजावर गस्त घालणाऱ्या अधिकाऱ्यांनाही माहीत नव्हती.

1944 Bombay Explosion
दोन स्फोटांची विध्वंस दाखविणारा फोटो. (Railway Archive)

एबल सीमन आणि डेनिस महोनी यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रात या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की, १४ एप्रिल रोजी दुपारी १२.४५ वाजता जहाजाच्या व्हेटिंलेटर्स (हवा आत-बाहेर जाण्यासाठी असलेली जागा) मधून धूर आल्याचे दिसले.

दुपारी दीड वाजता पोलीस दलातील एका जवानानेही धूर पाहिला. पण जहाजावरील लोक परिस्थिती नियंत्रणात आणत असतील असे गृहित धरून त्याने दुर्लक्ष केले. दुपारी पावणे दोन वाजता माल चढविणाऱ्या कामगारांच्या गटाच्या फोरमनला धूर दिसला. त्याने तात्काळ धोक्याची सूचना दिली. पाण्याच्या नळ्या धूर येत होता त्या दिशेला वळवल्या.

जहाजावरील धावपळ पाहून सेक्शन लीडरने आपल्या सब लीडरला अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून त्यांना ‘नंबर टू’ संदेश देण्याचा आदेश दिला. (यामुळे अग्निशमन नियंत्रण कक्षाला जहाजात स्फोटके असल्याची सूचना मिळाली असती) मात्र सब लीडरला नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करता आला नाही. त्यामुळे त्याने फायर अलार्मची काच फोडली, ज्यामुळे अग्निशमन दलाला आगीची सूचना मिळाली. पण त्यात जहाजात स्फोटके असल्याचा त्यांना अंदाज आला नाही.

याचा परिणाम म्हणून अग्निशमन दलाने केवळ दोन बंब पाठवले. त्यातही दाट धूर असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आगीचा स्त्रोत सापडला नाही. त्यांनी अंदाजे पाणी आत सोडले, असे महोनींच्या आत्मचरित्रात लिहिले आहे.

अर्ध्या तासाच्या अंतराने दोन स्फोट

दुपारी ४ वाजून ६ मिनिटांनी जहाजात मोठा स्फोट होऊन बेट हादरले. स्फोट इतका भीषण होता की जहाजाचे दोन तुकडे झाले. अर्ध्या तासाने साधारण ४ वाजून ४१ मिनिटांनी दुसरा स्फोट झाला. ज्यामुळे व्हिक्टोरिया डॉकवर उभ्या असलेल्या सर्व १३ जहाजांचे नुकसान झाले.

Mumbai Fire Brigade pay tribute to the martyrs
मुंबई अग्निशमन दलाची सुरक्षा सप्ताहानिमित्त मानवंदना (Express Photo By Ganesh Shirsekar)

अग्निसुरक्षा सप्ताहात काय केले जाते?

या वर्षी अग्निसुरक्षा सप्ताहाची संकल्पना सुरक्षित शाळा, सुरक्षित रुग्णालये, सुरक्षित समाज अशी संकल्पना आखली गेली आहे. मुंबईच्या तब्बल ३५ अग्निशमन केंद्रांमध्ये अग्निसुरक्षा मोहीम आयोजित केली असून भायखळा येथील मुख्यालयात प्रदर्शन भरविण्यात आले आहे. १४ एप्रिल १९४४ च्या स्फोटानंतर बचाव कार्यासाठी वापरण्यात आलेली ओतीव लोखंडाची शिडी या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे.