रवींद्र जुनारकर

औद्योगिक जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्हय़ातील एकूण १२ औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) १ हजार १६४ औद्योगिक भूखंडांपैकी ८१३ भूखंडांचे वाटप झाले आहे. त्यातील ९२ मोठे उद्योग पूर्णत: बंद पडल्याने ३५६ भूखंड मोकळेच आहेत. इतर २८० भूखंडही वाटपाच्या प्रतीक्षेत आहेत. यातील ५३ भूखंडांवर अर्धवट बांधकाम झाले आहे. याचाच अर्थ १ हजार १६४ पैकी ७८१ भूखंड रिकामे असून हा जिल्हा खरोखर औद्योगिक जिल्हा आहे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोलि) च्या ३० पेक्षा अधिक कोळसा खाणी, एसीसी, अंबुजा, अल्टाटेक, मुरली, माणिकगड असे पाच सिमेंट कारखाने, पेपर मिल, पोलाद उद्योग आणि सर्वात मोठे महाऔष्णिक वीज केंद्र यामुळे या जिल्हय़ाची राज्य पातळीवर औद्योगिक जिल्हा अशी ओळख निर्माण झाली आहे. मात्र मागील १५ वर्षांत या जिल्हय़ात एकही नवीन मोठा उद्योग किंवा कारखाना सुरू झालेला नाही. त्याला कारणही तसेच आहे. प्रदूषणामुळे या जिल्हय़ात उद्योगबंदी होती. प्रदूषणासारख्या गंभीर प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. उद्योगबंदी लादली गेली आणि बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले. आज या जिल्हय़ात चंद्रपूर, ताडाळी, भद्रावती, घुग्घुस, वरोरा, मूल, राजुरा, चिमूर, गोंडपिंपरी, नागभीड, सिंदेवाही, भद्रावती (लघु) अशा एकूण १२ औद्योगिक वसाहती (एमआयडीसी) आहेत. या १२ औद्योगिक वसाहतींमध्ये सर्वाधिक ४९३ औद्योगिक भूखंड चंद्रपूर एमआयडीसीमध्ये आहेत. त्यातील ४१४ भूखंडांचे वाटप झाले असून २१७ भूखंडांवर उद्योग उभे झाले आहेत. २५ भूखंडांवर बांधकाम सुरू होऊन ते बंदही पडले आहेत. ७० उद्योग पूर्णत: बंद असून १०२ भूखंड वाटप केल्यानंतरही मोकळे पडून आहेत. ६० भूखंड वाटपासाठी उपलब्ध असून १ व्यापारी भूखंड उपलब्ध आहे. ताडाळी वसाहतीत २८३ भूखंडांपैकी १७० भूखंडांचे वाटप झाले आहे. त्यातील केवळ ४१ भूखंडांवर उद्योग, उत्पादन सुरू असून १८ भूखंड बांधकामाखाली आहेत. ८ भूखंड बंद अवस्थेत आहे. वाटप केलेले १०३ भूखंड मोकळे असून ८९ भूखंड वाटपास उपलब्ध आहेत. ११ व्यापारी भूखंड उपलब्ध आहेत. भद्रावती (मोठे) औद्योगिक वसाहतीत ३ भूखंड असून २ भूखंडांचे वाटप झालेले आहे. वाटप करण्यात आलेले दोन्ही भूखंड हे मोकळे आहेत. घुग्घुस वसाहतीत एकूण ४ भूखंड असून चारही भूखंड वाटप करण्यात आले असून चारही ठिकाणी उत्पादन सुरू आहे. वरोरा वसाहतीत ५३ भूखंड असून ४० भूखंड वाटप करण्यात आले असून २१ ठिकाणी उत्पादन सुरू आहे. २ भूखंड बांधकामाखाली असून ५ भूखंड बंद अवस्थेत आहे. वाटप केलेले १२ भूखंड हे मोकळे असून १५ भूखंड वाटपास उपलब्ध आहेत. मूळ औद्योगिक वसाहतीत ५१ भूखंड असून ४२ भूखंड वाटप करण्यात आले असून ८ ठिकाणी उत्पादन सुरू आहे. ३ भूखंड बांधकामाखाली असून २ भूखंडांवरील उद्योग हे बंद आहेत. वाटप करण्यात आलेले २९ भूखंड मोकळे असून ६ वाटपास उपलब्ध असून १ व्यापारी भूखंड आहे. राजुरा वसाहतीत एकूण ९७ भूखंड असून ३६ भूखंड वाटप करण्यात आलेले असून २ ठिकाणी उत्पादन सुरू आहे. वाटप करण्यात आलेले ३४ भूखंड मोकळे असून ५८ भूखंड हे वाटपास उपलब्ध आहेत. चिमूर  वसाहतीत ३६ भूखंड असून २९ भूखंड वाटप करण्यात आले असून ९ ठिकाणी उत्पादन सुरू आहे. १ भूखंड बांधकामाखाली असून ३ भूखंडांवरील उद्योग बंद अवस्थेत आहे. वाटप करण्यात आलेले १६ भूखंड मोकळे असून ६ भूखंड वाटपास उपलब्ध आहेत. गोंडपिपरी वसाहतीत २८ भूखंड असून ३ भूखंड वाटप करण्यात आले आहेत. वाटप करण्यात आलेले ३ भूखंड मोकळे असून २० भूखंड वाटपास उपलब्ध असून १ भूखंड व्यापारी आहे. नागभीड वसाहतीत ३१ भूखंड असून २४ भूखंड वाटप करण्यात आले असून ५ भूखंडावर उद्योगातील उत्पादन सुरू आहे. २ भूखंड बांधकामाखाली आहे. वाटप करण्यात आलेले १७ भूखंड मोकळे असून ५ भूखंड वाटपास उपलब्ध असून २ व्यापारी भूखंड आहे. सिंदेवाही वसाहतीत ३३ भूखंड असून २१ भूखंड वाटप करण्यात आले असून १ ठिकाणी उत्पादन सुरू आहे. ३ भूखंडांवरील उद्योग बंद असून वाटप करण्यात आलेले १७ भूखंड मोकळे आहेत. ७ भूखंड वाटपास उपलब्ध असून १ व्यापारी भूखंड आहे. भद्रावती (लघु)   वसाहतीत ५० भूखंड असून २१ भूखंड वाटप करण्यात आले असून ४ उत्पादनाखाली आहे. २ भूखंड बांधकामाखाली असून १ भूखंडावरील उद्योग बंद अवस्थेत आहे. वाटप करण्यात आलेले २१ भूखंड मोकळे असून १७ भूखंड वाटपास उपलब्ध असून १ भूखंड व्यापारी आहे.

आजही काही उद्योगपती उद्योग सुरू करण्यास तयार आहेत. मात्र त्यांना भूखंड मिळत नाही.  क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी चंद्रपूरला नियमित यायला हवे, भूखंडाची जाहिरात द्यायला हवी. तेव्हाच नवीन उद्योजक समोर येतील. बंद उद्योगांबाबत तात्काळ निर्णय घेऊन व भूखंड ताब्यात घेऊन ते उद्योग सुरू करण्यास इच्छुक उद्योजकांना द्यायला हवे. ही संपूर्ण प्रक्रिया मागील अनेक दिवसांपासून बंद आहे.

– मधुसूदन रूंगठा, अध्यक्ष, चंद्रपूर    एमआयडीसी असोसिएशन

अनेक भूखंड मोकळे पडले आहेत. काही उद्योजकांनी तर भूखंड परस्पर दुसऱ्यांना विकले.  सर्व अनागोंदी कारभार सुरू असल्यामुळे नवीन उद्योग येथे आले नाही, जे होते ते उद्योग बंद पडले आहेत. येथील कार्यालयात पदांची भरती करून नियमित अधिकारी देण्यात यावा.

– रमेश माखिजा, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस</p>

चंद्रपूर जिल्हय़ातील १२ औद्योगिक वसाहतींमध्ये आज मोठय़ा प्रमाणात भूखंड रिकामे आहेत. नवीन उद्योजक येत नसल्यामुळेच भूखंड तसेच पडून आहेत.

– यादव, विभागीय अधिकारी, एमआयडीसी