टाळेबंदीचे निर्बंध जून महिन्यात शिथील झाल्यानंतर करोनाबळींसह बाधित रूग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा टाळेबंदी तथा संचारबंदी लागू होण्याबाबत मतप्रवाह सुरू असताना, मागील आठवड्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव आणखी वाढल्याचे दिसून येत आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्यात मागील आठवडाभरात तब्बल ७९५ बाधित रूग्णांची नव्याने भर पडली असून, मृतांचा आकडाही ४२ ने वाढला आहे. शहरात १ जुलै ते ७ जुलैपर्यंत ५६९ करोनाबाधित नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर ३२ मृतांची भर पडली आहे. दुसरीकडे जिल्हा ग्रामीणमध्येही करोना प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. १ जुलै ते आज ७ जुलैपर्यंत सात दिवसांमध्ये ग्रामीण भागात २२६ बाधित रूग्ण वाढले आहेत. तर मृतांची संख्याही दहाने वाढली आहे. वाढती रूग्णसंख्या आणि बळींचे प्रमाण चिंताजनक असल्याचे दिसून येते.

३० जूनपर्यंत शहरातील बाधित रूग्णसंख्या २ हजार २८३ आणि मृतांची संख्या २५० इतकी होती. सात दिवसानंतर, मंगळवारी रात्रीपर्यंत त्यात मोठी भर पडून रूग्णसंख्या २ हजार ८५२ वर पोहोचली आहे. मृतांची संख्याही वाढून २८२ पर्यंत पोहचली आहे. शहरात मागील सात दिवसात दररोज सरासरी ८१ रूग्ण सापडल्याचे दिसून आले.
जिल्हा ग्रामीण भागात ३० जूनपर्यंत रूग्णसंख्या ३६१ आणि मृतांची संख्या १७ होती. सात दिवसांनी, मंगळवारी बाधित रूग्णसंख्या ५८७ वर पोहोचली तर मृतांचा आकडाही ३७ झाला आहे. म्हणजे सात दिवसांत रूग्णसंख्या २२६ तर मृतांची संख्या २० ने वाढली आहे. या कालावधीत दररोज सरासरी ३२ रूग्ण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

अक्कलकोटची स्थिती चिंताजनक –
जिल्हा ग्रामीण भागात मंगळवारी सायंकाळी नव्याने ३० बाधित रूग्ण आढळून आले. तर एकाचा मृत्यू झाला. अक्कलकोटमध्ये फत्तेसिंह चौकात यापूर्वी करोनामुळे मृत्यू झालेल्या एका व्यक्तीच्या घरात सात नवे बाधित रूग्ण सापडले. जंगी प्लाटमध्येही नवीन पाच रूग्ण आढळून आले. अक्कलकोटमध्ये दिवसभरात १६ नव्या रूग्णांची भर पडली असून तेथील रूग्णसंख्या ११६ वर गेली, असून यात सात मृतांचा समावेश आहे. बार्शीतही नवे पाच रूग्ण आढळून आले असून तेथील पाच मृतांसह रूग्णसंख्या ११० झाली आहे. सर्वाधिक २१० रूग्णसंख्या दक्षिण सोलापूर तालुक्यात असून यात सात मृतांचा समावेश आहे. पंढरपूर शहर व परिसरातही तीन रूग्णांची नव्याने भर पडली आहे. ग्रामीण भागातील एकूण ५८७ रूग्णसंख्येपैकी २४१ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.