महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या सदस्यांच्या आठ जागी नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी येत्या गुरुवारी (दि. १२) मनपाची विशेष सभा बोलावण्यात आली आहे.
महापौर तथा आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होईल. या सभेत एवढा एकच विषय ठेवण्यात आला आहे. मनपा नियमानुसार समितीचे आठ सदस्य गेल्या महिन्यात निवृत्त झाले. चिठ्ठी काढून हे आठ सदस्य निश्चित करण्यात आले. समितीचे मावळते सभापती किशोर डागवाले (मनसे) यांच्यासह शारदा ढवण, उमेश कवडे व सुनीता मुदगल (सर्व शिवसेना), नंदा साठे, दत्तात्रेय कावरे (दोघेही भाजप), शेख फैयाज व बाळासाहेब बोराटे (दोघेही राष्ट्रवादी) यांचा निवृत्त होणाऱ्या आठ सदस्यांमध्ये समावेश आहे. त्या जागेवर आता नवे सदस्य नेमण्यात येणार आहेत. निर्धारित कोटय़ानुसार सर्व पक्षांच्या गटनेत्याच्या शिफारशी घेऊन त्यानुसार या निवडी करण्यात येतील. वरील कोटय़ानुसारच पक्षीय पातळीवर नव्या सदस्यांची निवड होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्वच पक्षांमध्ये मोर्चेबांधणी सुरू आहे.
मनसेकडून यंदा त्यांचे ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले यांची स्थायी समितीत वर्णी लागण्याची चिन्हे असून तेच पुढच्या सभापतिपदाचेही दावेदार आहेत. मनपात सत्तेची गणिते जुळवताना मनसेने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला असून त्या वेळी ठरल्यानुसार पाचही वर्षी स्थायी समितीचे सभापतिपद मनसेला देण्याचे ठरले, असा दावा केला जात आहे. त्यानुसारच भोसले यांनी त्या दिशेने मोर्चेबांधणी सुरू केल्याचे समजते.
दरम्यान, या निवडीपूर्वी बुधवारीही (दि. ११) मनपाची सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे. विविध २० विषय या सभेसमोर ठेवण्यात आले आहेत.