महिला सक्षमीकरणाच्या कितीही बाता मारत असलो तरी आजही ग्रामीण भागातील महिलांना समाजाकडून अवहेलना सहन करावी लागते आहे. याचा प्रत्यय रायगड जिल्ह्य़ात येतो आहे. श्रीवर्धन तालुक्यातील वडघर येथील रसिका मांडवकर ही निराधार महिला गेली ८ वष्रे गावकीचा जाच सहन करते आहे
वडघर गावच्या सतीची वाडी येथील रसिका मांडवकरच्या कुटुंबाला गावकीने ८ वर्षांपूर्वी क्षुल्लक कारणावरून वाळीत टाकले. तेव्हापासून रसिकाचे पती रमेश मांडवकर हे बेपत्ता आहेत त्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे. पती बेपत्ता झाल्यानंतर रसिकाने गाव सोडले. मुंबईत राहून घरकाम करू लागली. गावकीचा १० हजार रुपये इतका दंडही तिने भरला. परंतु तिच्यावरचा अन्याय कमी होत नव्हता. आता गावात नवीन घर बांधायला घेतले तर तिथेही ग्रामस्थ मांजरासारखे आडवे आले. २६ जानेवारी रोजी झालेल्या बठकीत घर बांधलेस तर ते गावकीच्या नावावर करून दे ही गावकीची मागणी तिने फेटाळून लावली, त्यामुळे तिला गावाच्या बाहेर काढण्यात आले असल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे.
मात्र रसिका यांनी केलेले हे आरोप ग्रामस्थांना मान्य नाहीत. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत. गावात असा काहीच प्रकार झाला नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, ग्रामस्थ जरी हात वर करत असले तरी गावातील रसिकाचे नातेवाईक तिच्या बाजूने उभे राहिलेत. रसिकावरील अन्याय दूर व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तिच्या बाजूने उभे राहिलेत आणि रसिकाला आसरा दिला म्हणून त्यांनाही दंड थोटावण्यात आला आणि तिला मारहाण करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
रसिकाने पोलीस ठाण्यात तसेच जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. तक्रार येताच पोलिसांनी ग्रामस्थांची बठक लावली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र रसिका स्वत: हजर नसल्याने निर्णय घेता येत नसल्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार चाफेकर यांनी सांगितले.