“आजची तरुण पिढी पदव्या घेऊन नोकरीच्या मागे धावते, पण खरी प्रगती नोकरी शोधण्यात नाही तर ती निर्माण करण्यात आहे,” असा रोखठोक विचार मांडणाऱ्या एका ८० वर्षीय पुणेकर आजोबांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पुण्याच्या कसबा पेठेतील एका पारंपरिक दुकानातून त्यांनी दिलेला हा संदेश इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, यावर मोठी चर्चा रंगली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

व्हायरल व्हिडिओमध्ये हे ज्येष्ठ व्यावसायिक आपल्या ५०-६० वर्षांच्या अनुभवाची शिदोरी तरुणांसमोर उघड करतात. कसबा पेठेतील आपले पिढीजात दुकान सांभाळत असताना त्यांनी बेरोजगारीच्या प्रश्नावर भाष्य केले. “नोकऱ्या शोधण्यापेक्षा व्यवसाय उभा करण्यावर भर द्या,” असा ‘हार्ड-हिटिंग’ सल्ला त्यांनी दिला आहे. त्यांच्या मते, स्वतःचा व्यवसाय केल्याने केवळ स्वावलंबन येत नाही, तर इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

शिक्षण की अनुभव?

विशेष म्हणजे, या आजोबांनी केवळ व्यवसायावरच लक्ष केंद्रित केले नाही, तर शिक्षणाचीही आवड जपली आहे. त्यांनी पदवी पूर्ण केली, एक वर्ष कायद्याचा अभ्यास केला, बी.एससी.चे शिक्षण घेतले आणि अगदी बायोडिझेल उत्पादनाचे प्रशिक्षणही घेतले. मात्र, त्यांच्या मते पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवसायातून आलेला प्रत्यक्ष अनुभव हा अधिक मोलाचा ठरला. “मी इतकं शिकलो, पण शेवटी व्यवसायानेच मला जगण्याची दिशा दिली,” असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

बदलत्या मानसिकतेवर चिंता

आजोबांनी आपल्याच कुटुंबातील तरुणांचे उदाहरण देत खंत व्यक्त केली. त्यांच्या घरातील तरुण पिढीला पारंपरिक व्यवसायात रस नसून ते बाहेर नोकरी करण्याला प्राधान्य देत आहेत. ही केवळ त्यांच्या घराची गोष्ट नसून संपूर्ण समाजाची मानसिकता बदलत चालल्याचे त्यांनी सांगितले.

नेटकऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया

या व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. “अनुभव बोलतोय, आजोबांना सलाम!” आणि “आजच्या काळात अशाच उद्योजकतेची गरज आहे,” अशा कमेंट्स करत अनेकांनी त्यांचे कौतुक केले. दुसरीकडे काही युजर्सनी उपरोधिक टीकाही केली आहे. एकाने म्हटले की, “८० वर्षात दुकान आहे तसेच राहिले, प्रगती कुठे झाली?” तर दुसऱ्याने पुणेरी संस्कृतीचा दाखला देत टोला लगावला की, “दुपारी १ ते ४ झोपून व्यवसाय करणारे हेच ते आजोबा!”, “प्रत्येकाची आवड वेगळी असते, सर्वांनाच व्यवसाय झेपेल असे नाही,” असा समतोल विचारही काही नेटकऱ्यांनी मांडला.

हा व्हिडिओ केवळ एका दुकानदाराची गोष्ट नसून, तो आजच्या काळातील शिक्षण विरुद्ध कौशल्य आणि नोकरी विरुद्ध व्यवसाय या संघर्षावर प्रकाश टाकणारा ठरला आहे.