मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील गुंतवणुकीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या उपसमितीने राज्यात ८१ हजार १३७ कोटी रूपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांद्वारे राज्यातील २० हजार तरुणांना रोजगार मिळल्याची शक्यत आहे. राज्य सरकारने परिपत्रक जारी करत यासंदर्भात माहिती दिली. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गुंतवणुकदारांचा ओघ वाढत आहे. त्यानुसार ८१ हजार १३७ कोटी रूपये गुंतवणुकीच्या प्रकल्पांना आज उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम बॅटरी, इलेक्ट्रील व्हेईकल, सेमीकंडक्टर चिप, फळांचा पल्प निर्मिती या प्रकल्पांचा समावेश आहे. याप्रकल्पांद्वारे कोकणसह मराठवाडा, विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे राज्यात सुमारे २० हजार तरुणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार असल्याचे राज्य सरकारने म्हटलं आहे. हेही वाचा - Anil Deshmukh on Eknath Shinde: “एकनाथ शिंदेंआधी पहिला प्रयोग माझ्यावर झाला”, अनिल देशमुखांचा मोठा दावा; म्हणाले, “तो यशस्वी झाला असता तर…” कोणत्या प्रकल्पांना मिळाली मंजूरी? १) जेएसडब्ल्यू एनर्जी पीएसपी इलेव्हन लि. यांची लिथियम बॅटरी निर्मितीच्या प्रकल्पासाठी गुंतवणूक. हा प्रकल्प नागपूर भागात होणार आहे. प्रकल्पामध्ये एकूण २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. याद्वारे ५ हजार पेक्षा अधिक रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता आहे. २) जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलीटी लि. कंपनी, इलेक्ट्रीक आणि हायब्रीड वाहन निर्मिती प्रकल्प : हा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण २७ हजार २०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. याद्वारे ५ हजार २०० पेक्षा अधिक रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामध्ये वार्षिक ५ लाख इलेक्ट्रीक प्रवासी कार व १ लाख व्यावसायिक कार निर्मितीचे नियोजन आहे. ३) हिंदूस्थान कोका-कोला बेव्हरेज मार्फत फळाचा पल्प आणि रस यावर आधारित उत्पादन निर्मिती प्रकल्प : हा प्रकल्प रत्नागिरी येथे होणार आहे. यात १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. ४) आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमार्फत सेमीकंडक्टर चिप्स निर्मितीचा एकात्मिक प्रकल्प : हा प्रकल्प रायगड जिल्ह्यातील तळोजा/पनवेल, रायगड/पुणे/उर्वरीत महाराष्ट्रामध्ये उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्रातला हा पहिलाच सेमीकंडक्टर निर्मिती करणारा प्रकल्प आहे. याप्रकल्पामध्ये प्रथम टप्यात १२ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक होणार. याद्वारे ४ हजार पेक्षा अधिक रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्यामध्येही १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. महापे, नवी मुंबई येथे प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, प्रायोगिक तत्वावर सप्टेंबर २०२४ पर्यंत सुरू होणार आहे. हेही वाचा - Mahayuti : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ, महायुतीपुढची नेमकी आव्हानं काय? ५) आवाडा इलेक्ट्रो कंपनीचा सोलर पीव्ही मॉड्युल्स आणि इलेक्ट्रोलायझरचा एकात्मिक प्रकल्प : हा प्रकल्प नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी अतिरिक्त एमआयडीसी, पनवेलमधील भोकरपाडा एमआयडीसी या परिसरात उभारण्यात येणार आहे. कंपनीमार्फत नवीकरणीय ऊर्जा स्रोताचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित राज्यात प्रकल्प स्थापित होणार आहे. प्रकल्पामध्ये एकूण १३ हजार ६४७ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, याद्वारे ८ हजार पेक्षा अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे. ६) परनॉर्ड रिकार्ड इंडिया प्रा.लिमिटेड मार्फत मद्यार्क निर्मितीचा प्रकल्प : हा प्रकल्प नागपूरमधील अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसी येथे स्थापन करण्याचे नियोजित आहे. प्रकल्पामध्ये १७८५ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.