तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सुमारे ८५ टक्के मतदान झाले. किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडले. थेरगाव येथे एकाच नावाचे दोघे मतदानासाठी आल्याने काही वेळ मतदान प्रकिया निवडणूक अधिकाऱ्यांनी थांबवली होती. नंतर पुन्हा सुरळीत झाली. सुपे येथे दोन गटांमध्ये किरकोळ वादावादी झाली.
सर्वच ग्रामपंचायतींच्या ठिकाणी मतदानासाठी सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. मतदार आणण्यासाठी वाहनांचा सर्वत्र वापर झाला. याशिवाय बाहेरगावी असलेले मतदारही आणण्यात आले होते. त्यामुळे सर्वच ग्रामपंचायतींमध्ये विक्रमी मतदान झाले. तालुक्यात ५६ ग्रामंपचायती होत्या. ४ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाल्याने ५२ ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाले. एकूण ९० हजार २५४ मतदारांपैकी ७६ हजार ६३५ मतदारांनी (८४.९१) मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी शुक्रवारी कर्जत तहसील कार्यालयात होणार आहे.