किरकोळ अपवाद वगळता जिल्ह्य़ातील ६८८ ग्रामपंचायतींसाठी आज, मंगळवारी शांततेत मतदान झाले. अनेक ठिकाणी मतदानासाठी मतदारांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. स्थानिक पातळीवरील निवडणुका व उमेदवारांनी जास्तीतजास्त मतदान घडवून आणण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे मोठय़ा संख्येने मतदान झाले आहे. मतदान संपल्यावर लगेच गावपातळीवरून सीलबंद मतपेटय़ा प्रत्येक तालुका ठिकाणी आणण्यात आल्या. गुरुवारी (दि. ६) सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे.
जिल्ह्य़ातील एकूण ग्रामपंचायतींपैकी निम्म्याहून अधिक ठिकाणी निवडणुका असल्याने प्रचाराचा मोठा गदारोळ निर्माण झाला होता. रात्री उशिरापर्यंत मतदानाची टक्केवारी हाती आलेली नव्हती. परंतु प्रशासनाकडून मिळालेल्या अंदाजानुसार नगर तालुक्यात ८५ टक्के, अकोल्यात ८५.२६ टक्के, राहत्यात ७९ टक्के, श्रीगोंद्यात ९३ टक्के, जामखेडमध्ये ८६ टक्के, कर्जतला ७९ टक्के, संगमनेर ८४.६२ टक्के, श्रीरामपूर ८१.५४ टक्के, राहुरी ८५.४० टक्के, नेवासे ८६.५३ टक्के मतदान झाले. कोपरगाव तालुक्यातील काही ठिकाणी रात्री साडेसातपर्यंत मतदारांच्या मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.
प्रशासनाच्या माहितीनुसार बंद पडल्याने किमान ९ ठिकाणी मतदान यंत्रे बदलावी लागली. नगर शहरालगतच्या ग्रामपंचायतींसाठीही मतदारांत उत्साह जाणवला. नवनागापूर, निंबळक, वडारवाडी येथे सुमारे ९० टक्क्य़ांपर्यंत मतदान झाल्याचा अंदाज आहे. नगर तालुक्यातील ग्रामपंचायतीची मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालयालगतच्या सैनिक लॉन्सवर होणार आहे.
जिल्ह्य़ातील ७४९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यातील ६१ ठिकाणी बिनविरोध निवडी झाल्या. एकूण ६ हजार २६५ प्रभागांसाठी एकूण १४ हजार ३६७ उमेदवार रिंगणात होते.