कोयना जलसागरात ५० दिवसांत बक्कळ ८६ टीएमसीची आवक

कोयना धरण क्षेत्रात व धरणाखालील कृष्णा, कोयनाकाठी पावसाची ६ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. तर, गतवर्षी आजअखेर कोयना धरणात केवळ १३ टीएमसीची भर पडली होती.

कोयना धरण क्षेत्रात व धरणाखालील कृष्णा, कोयनाकाठी पावसाची दिवसा ओढ राहताना रात्री मात्र, पावसाचा जोर चांगलाच वाढतो आहे. अपवाद वगळता गेल्या ५० दिवसातील धो-धो पावसामुळे कोयना धरणात सुमारे ८६ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. तर, गतवर्षी आजअखेर कोयना धरणात केवळ १३ टीएमसीची भर पडली होती.
आजमितीला धरणाचा पाणीसाठा ८७.८३ टीएमसी असताना, धरणातून मोठय़ाप्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गतवर्षी मात्र, हाच पाणीसाठा ४५.५२ टीएमसी म्हणजेच ४३.२४ टक्के असा चिंताजनक होता. त्यामुळे कोयनेच्या वीज निर्मितीवरील संभाव्य र्निबधांची भीती ओढावली होती. यंदा मात्र बक्कळ पाऊस अन् बक्कळ पाणीसाठा असल्याने संभाव्य महापुराचा धोका टाळण्यासाठी धरणाचे दरवाजे तब्बल साडेबारा फुटांपर्यंत उचलून पाण्याचा मोठय़ाप्रमाणात विसर्ग कोयना नदीत करण्यात येत आहे.
आज सायंकाळी ५ वाजता कोयना धरणाची पाणी पातळी  २ हजार १४९ फूट ११ इंच राहताना, पाणीसाठा ८७.८३ टीएमसी असून, गतवर्षी हीच पाणीपातळी २ हजार १०२ फूट १ इंच तर,  पाणीसाठा ४५.५२ टीएमसी म्हणजेच ४३.२४ टक्के होता. गतवर्षी धरणक्षेत्रातील सरासरी पाऊस १८६६.३३ मि. मी. होता. तर, यंदा ३८३२.६६ मि. मी. पाऊस कोसळला असून, तो गतवर्षीच्या तुलनेत तब्बल सव्वा दोनपट जादा आहे. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत गेल्या ३५ तासात कोयना धरण क्षेत्रातील कोयनानगर विभागात १२९ एकूण ३,४६१, महाबळेश्वर विभागात १२२ एकूण ३,८०५ तर, नवजा विभागात १०३ एकूण सर्वाधिक ४२३२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी हाच पाऊस कोयनानगर विभागात १२० एकूण १,७९२ मि. मी., महाबळेश्वर विभागात १४७ एकूण १,६८० मि. मी. तर नवजा विभागात १७६ एकूण सर्वाधिक २,१२७ मि.मी. नोंदला गेला होता. कोयना पाणलोट क्षेत्रात गतवर्षी आजअखेर सरासरीच्या तुलनेत निम्म्याहून कमी  पाऊस झाला होता. यंदा मात्र, सरासरीच्या दुप्पट पाऊस झाल्याचे धरण व्यवस्थापनाने सांगितले.
आज सकाळी ८ वाजता गेल्या २४ तासात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यात कराड तालुक्यात ७.२९ एकूण ३३९.१५ तर पाटण तालुक्यात ३१.८३ एकूण १२४४.५ मि. मी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी कराड तालुक्यात सरासरी १७७.१० तर पाटण तालुक्यात ७०७.५५ मि.मी. एकूण पावसाची नोंद आहे. गतवर्षी  पाटण तालुक्यातील नवजा विभागात सर्वाधिक २,१२७ पावसाची नोंद आहे यंदा याच नवजा विभागात सर्वाधिक ४,२३२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या पाटणनजीकचा संगमनगर धक्का पूल, तसेच मुळगाव, मेंढेघर आदी पूलही पाण्याखाली असल्याने सुमारे ७२ गावे व वाडय़ावस्त्या अंशत: व पूर्णत: संपर्कहीन असून, कृष्णा, कोयना नद्या पूरसदृश स्थितीत वाहत आहेत. कोयना धरणाची पाणीपातळी २१४५ फुटावर नियंत्रित करण्यात येत असल्याचे धरणव्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 86 tmc water increase in koyna dam