करोना विरोधात देशाच्या सुरू असलेल्या लढ्यातील आघाडीच्या योद्धांपैकी एक असलेले पोलीस देखील करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. मागील २४ तासांत राज्यात ८८ पोलीस करोना पॉझिटिव्ह आढळले असून, एका पोलिसाचा करोनानेमुळे मृत्यू झाला आहे. तर, राज्यातील करोनाबाधित पोलीसांच्या संख्येना आता ४ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

राज्यात करोनाबाधित पोलिसांची संख्या ४ हजार ४८ वर पोहचली आहे. तर, आतापर्यंत ४७ पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. महाराष्ट्र पोलिस विभागाकडून ही माहिती मिळाली आहे. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे.  या अगोदर काल ४८ तासांत १४० पोलीस करोना पॉझिटिव्ह आढळल्याची नोंद झाली होती.

करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा देशात कहर सुरू असल्याचे दिसत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात आतापर्यंतचे सर्वाधिक तब्बल १५ हजार ४१३ नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर, ३०६ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. देशभरातील  करोनाबाधितांच्या संख्येने आता चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

देशात ४ लाख १० हजार ४६१ करोनाबाधितांची नोंद झालेली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले १ लाख ६९ हजार ४५१ जण, उपचारानंतर सुट्टी देण्यात आलेले २ लाख २७ हजार ७५६ जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १३ हजार २५४ जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.