scorecardresearch

आठ कोटींची रोल्स रॉयस विकत घेणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्याविरोधात ३५ हजारांच्या वीजचोरीप्रकरणी गुन्हा दाखल

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर संजय गायकवाड यांनी भरली पूर्ण रक्कम

rolls royce owner Sanjay Gaikwad, Kalyan, Electricity Theft Case, Kalyan, Kolswadi,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने (एमएसईडीसी) गेल्या आठवड्यात संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

कल्याणमधील एका बांधकाम व्यावसायिकाविरोधात वीजचोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचा पदाधिकारी असणाऱ्या या व्यावसायिकाने नुकतीच तब्बल आठ कोटींची रोल्स रॉयसची कार विकत घेतली होती. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने (एमएसईडीसी) गेल्या आठवड्यात संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अशोक बुंधे यांच्या नेतृत्वातील एका पथकाने संजय गायकवाड यांच्या बांधकामांच्या ठिकाणांची पाहणी केली. कल्याणच्या कोळसेवाडीमधील बांधकामाच्या ठिकाणी वीजेचा गैरवापर केला जात असल्याचं यावेळी निदर्शनास आलं. यानंतर एमएसईडीसीएलने तात्काळ संजय गायकवाड यांनी ३४ हजार ८४० रुपयांचं बिल पाठवलं. तसंच १५ हजारांचा दंडदेखील ठोठावण्यात आला.

संजय गायकवाड यांनी तीन महिन्यानंतरही रक्कम भरली नसल्याने अखेर अशोक बुंधे यांनी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दिली. एमएसईडीसीएलचे प्रवक्ते विजयसिंह दुधभाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल केल्यानंतर संजय गायकवाड यांनी बिल तसंच दंडाची पूर्ण रक्कम भरली.

वीजचोरी प्रकरणी दंडासोबत तीन वर्षांच्या कारावसाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात असं विजयसिंह यांनी सांगितलं आहे. दरम्यान संजय गायकवाड यांनी आपल्याविरोधात खोटी तक्रार दाखल करण्यात आल्याचा आरोप केला आहे. जर मी वीज चोरली होती तर बांधकामाच्या ठिकाणी असणारे मीटर का काढण्यात आले नाहीत? अशी विचारणा त्यांनी केली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-07-2021 at 08:42 IST