चंद्रपूर : चंद्रपूर-मूल मार्गावरील अजयपूरजवळ गुरुवारी रात्री डिझेल टँकर आणि लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रकची टक्कर झाल्याने दोन्ही वाहनांनी पेट घेतला. या दुर्घटनेत टँकर आणि ट्रकमधील नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथून चंद्रपूरला लाकूड घेऊन येणारा ट्रक आणि चंद्रपूरहून मूलकडे जाणारा डिझेल टँकर यांची टक्कर झाल्यानंतर दोन्ही वाहनांनी क्षणात पेट घेतला. या आगीत ट्रक आणि टँकरमधील नऊ जणांचा दुर्घटनास्थळीच होरपळून मृत्यू झाला. लाकूड भरलेल्या ट्रकमध्ये वाहनचालक अजय सुधाकर डोंगरे (३०), प्रशांत मनोहर नगराळे (३३), मंगेश प्रल्हाद टिपले (३०), महिपाल परचाके (२५), बाळकृष्ण तुकाराम तेलंग (४६), साईनाथ बापूजी कोडापे (४०), संदीप रवींद्र आत्राम (२२) रा. तोहोगाव हे सर्व मजूर लाकूड उतरवण्यासाठी चंद्रपूरला येत होते. त्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. डिझेल टँकरचा चालक हनिफ खान (३५, अमरावती) आणि त्याचा साहाय्यक सुखदेव चंपतराव कैकाडी (३५, वर्धा) यांचाही होरपळून मृत्यू झाला.

या अपघातामुळे चंद्रपूर-गडचिरोली मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. मृतांची ओळख पटवण्यासाठी रामनगर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांना पाचारण केले. मृतदेह चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.